दोन तरुणांची आत्महत्या

मराठवाडय़ात मराठा आरक्षणासाठीची आंदोलने ठिकठिकाणी सुरूच आहेत. औरंगाबादेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दशमेशनगर परिसरातील निवासस्थानी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले. हिंगोलीतील वसमतमध्येही महिलांनी ठिय्या आंदोलन केले.

नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथे गणपत बापूराव आबादार (वय ३८) या तरुणाने रविवारी छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. लोहा शहरात तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशी सुरूच होते.

आंदोलनास समाजातील सर्वानी एकमुखाने पांठिबा दर्शविला. ९५ वर्षीय भाई केशवराव धोंडगे यांनी मुख्यमंत्र्यांवर मन्याडी भाषेत टीका केली. वेळप्रसंगी पहिल्यांदा मी जेलमध्ये जाईल असे पाठबळ आंदोलनकर्त्यांना दिले आणि पािठबा दर्शविला. आमदार चिखलीकर यांच्या निवासस्थानासमोरही आंदोलन करण्यात आले. आमदार चिखलीकरांनी आंदोलकांशी चर्चा केली.

देगलूर-बिलोली मतदार संघाचे आमदार सुभाष साबणे यांच्या देगलूर-उदगीर रस्त्यावरील निवासस्थानासमोरही घंटानाद शनिवारी आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्य़ातही आंदोलनाची धग कायम आहे.

गेवराई, केजमध्ये तीन, माजलगावात पाच दिवसांपासून तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरुच असून ७ ऑगस्टपासून आता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलसमोर रक्तदान आंदोलन केले जाणार आहे. यातून जवळपास पाच हजार रक्त पिशव्या संकलित करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. दरम्यान परळीत अर्धनग्न आंदोलकांनी मारुतीला पाणी वाहून फडणवीस सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

तरुणाने जाळून घेतले

परभणी जिल्ह्य़ातील सेलू तालुक्याच्या डिग्रसवाडी येथील उच्चशिक्षित तरुण अनंत सुंदरराव लेवडे (वय २४) यांनी मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने जाळून घेऊन आत्महत्या केली. अनंत लेवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या फेसबुक खात्यावरून पोस्ट करून समाजास आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मी जातीसाठी बलिदान देत आहे, अशी टिप्पणी टाकून त्यांनी शेतात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

मराठा आंदोलन नक्षलवाद्यांसारखी चळवळ होऊ देऊ नका!

मराठा आरक्षणासाठी नैराश्यातून लोक जीव देत आहेत. आज जे जीव देत आहेत, ते उद्या जीव घेणार नाहीत, हे कशावरून, अशी विचारणा करत हे आंदोलन म्हणजे नक्षलवाद्यांसारखी चळवळ होऊ देऊ नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला. सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कोण काय करणार. आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ अटळ आहे, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित मराठा आरक्षण परिषदेची बैठक रविवारी पुण्यात पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.

आरक्षणावर तातडीने मार्ग होणारा अनर्थ कोण आणि कसा थांबविणार, असा सवाल करत ते म्हणाले, नक्षलवादी निर्माण होतात कसे? न्याय्य मागण्यांना जर झोडपून काढत असाल, चिरडण्याचा प्रयत्न करत असाल, त्यांच्यावर खटले टाकत असाल तर काय होणार, त्यामुळे या प्रश्नावर ताबडतोब मार्ग काढा, अन्यथा उद्रेक होईल. गेल्या तीस वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आरक्षणापासून समाजाची संपूर्ण पिढी वंचित राहिली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले. मात्र, पुढे लोकशाहीमध्ये त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

मराठा समाज प्रगत असल्याचे भासवले जाते. मात्र, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांमध्ये४५ टक्के नागरिक मराठा समाजाचे आहेत. हे नागरिक शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सर्वच स्तरांवर मागासलेले आहेत. इतर जातींना जसा न्याय दिला तसा न्याय मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. काल सत्तेत असणारे आज विरोधात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फारसा फरक नाही. मात्र, जनतेला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सर्वाची आहे. लोकशाही, वैचारिक पद्धतीने न्याय मिळत नसल्यास जनता कोणत्याही स्तरावर जाऊ शकते. हे जहाल वक्तव्य नसून समाजाची वेदना बोलून दाखवत आहे.