राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यातच आता नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं. तसं एक पत्रक सध्या चर्चेत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत छत्रपती संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांनी उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानत एक आवाहनही केलं आहे.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे? वाचा…

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.”

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार

“मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत. मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू.”

काही उणीवा आजही असतील, पण

“कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मतं असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील, पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.”

-छत्रपती संभाजीराजे