News Flash

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण: मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे.

वैद्यकीय व दंत वैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदापासूनच मराठा आरक्षण लागू केले. त्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा आदेश देऊन प्रवेश प्रक्रिया रद्द ठरवली. तो आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी नाराज होऊन सरकारविरुद्ध आंदोलन करायला लागली. त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यंदापासूनच आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने कॅबिनेटची विशेष बैठक बोलावून अध्यादेश पारित केला. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता एसईबीसी आरक्षण पूर्वलक्ष्यीप्रभावाने लागू झाला. या अध्यादेशाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या ४ जूनच्या आदेशाचा दाखल देऊन ही याचिका फेटाळण्यात आली. त्या आदेशाला डॉ. प्रांजली चरडे व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालाने याचिका फेटाळताच याचिकेतील मुद्दे विचारात घेतले नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश ग्राह्य़ धरला. त्यामुळे ही याचिका विचारात घेऊन अध्यादेश रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 12:14 pm

Web Title: maratha reservation pg medical courses for 2019 20 supreme court sgy 87
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवारांना पिंगा घालायला लावला-पाटील
2 आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीची ग्रँडमास्टरच्या दिशेने वाटचाल
3 विखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे हा मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार
Just Now!
X