दुष्काळावर मात करण्यासाठी खोदलेल्या दोन विंधन विहिरींतून पाण्याचा थेंबही हाती न लागल्याने अडीच लाखांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने जगण्याची लढाई अर्धवट सोडत शुक्रवारी मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे दुष्काळाचा जन्मजात कलंक घेऊन जीवन कंठणाऱ्या जतपासून २० किलोमीटरवरील १०० उंबऱ्यांचे खिलारवाडी सुन्न झाले.

जतपासून बिळूर मार्गावर १८ किलोमीटरवर असलेले खिलारवाडी हे ५०० लोकसंख्येचे १०० उंबऱ्यांचे गाव. या गावात राहणाऱ्या भरू अण्णाप्पा कोडलकर (वय ३३) आणि पत्नी पदुबाई (वय २७) या दोघांनी विषप्राशन करून जीवनयात्रा संपवली. भरू कोडलकर यांची गावालगतच एक एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी एक िवधन विहीर खोदली होती. त्याच्या पाण्याच्या आशेवर त्यांनी आयसीआयसीआय बँकेचे कर्ज घेऊन अर्धा एकर द्राक्षबाग फुलवली. मात्र, अनियमित निसर्गचक्रामुळे बागेची अवस्था यथातथाच राहिली. बागेतून गेल्या हंगामात अवघे ४० हजाराचे उत्पन्न मिळाले होते.

बागेची खरडछाटणी करण्यासाठी विंधन विहिरीतून पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यातच बँकेचे वसुलीसाठी पत्रही आले होते. त्यांनी पाण्यासाठी गुरुवारी पुन्हा शेतालगत असलेल्या घराच्या पाठीमागे नवी विंधन विहीर खोदली. या विहिरीलाही पाणी लागले नाही. याच दिवशी त्यांनी शेतामध्ये अन्य ठिकाणी आणखी एक विंधन विहीर खोदली. पण तिलाही पाणी लागले नाही. पाण्यासाठी पाण्यासारखा खर्च झाला. मात्र, पाणी लागलेच नाही. दुसरीकडे कर्जाची टांगती तलवार कायम राहिल्याने निराशेतच रात्री घरी परतलेल्या भरूने पत्नी पदुबाई हिच्यासह विषारी औषध प्राशन केले. या दाम्पत्याला वैभव (वय १४) आणि विशाल (वय १२) अशी दोन मुले आहे. वैभव हा शिक्षणासाठी आजोळी म्हैसाळ येथे राहतो. दुसरा मुलगा विशाल अंगणात झोपला होता. सकाळी आई-बाबा दार का उघडत नाही, अशी विचारणा त्याने शेजाऱ्यांकडे केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  दाम्पत्याच्या आत्महत्येची माहिती समजताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांनी नगरसेवक भया कुलकर्णी, नीलेश बामणे, विठ्ठल दोडमणी यांच्यासह खिलारवाडी गाठली. आई-बापाविना पोरक्या झालेल्या वैभव आणि विशालच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचे त्यांनी जाहीर केले.