एखादी भाषा शिकण्यासाठी तिचे ज्ञान पुरेसे होत नाही, तर तिची अन्य भाषांशी नाळ जोडण्यासाठी कोशवाङ्मयाची निर्मिती आवश्यक असते. हे ध्यानात घेऊन प्रा. अविनाश बिनीवाले यांनी पाच दशकांच्या अभ्यासातून मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशाची निर्मिती केली आहे.
मुळात आपण ज्या देशाला जर्मनी संबोधतो त्याचे नाव आहे डॉइच्लान्ट. त्यामुळे तेथील भाषाही डॉइच् हीच आहे. या शब्दकोशासाठी जाणीवपूर्वक हा शब्द आग्रहाने वापरल्याचे प्रा. बिनीवाले म्हणाले. ही कोशनिर्मिती प्रकाशित करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांच्याकडून हे काम न झाल्याने राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा कोश प्रकाशित करण्यासाठी सहकार्य केले. भाषाभ्यासक डॉ. प्रमोद तलगेरी यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही दिली.
कोशाची वैशिष्टय़े सांगताना प्रा. बिनीवाले म्हणाले, जे ध्वनी भारतीय भाषांमध्ये नाहीत ते दाखवण्यासाठी नवीन अक्षरे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे चार स्वर आणि चार व्यंजने यांची भर मराठीत पडली असून ती मोठय़ा कल्पकतेने देवनागरीत समाविष्ट करून घेण्यात आली आहेत. जर्मन भाषा शिकायला सुरुवात करणाऱ्यापासून ते पदवी संपादू तसेच भाषांतराचे काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हा शब्दकोश म्हणजे गीता आहे, असेही बिनीवाले यांनी सांगितले.