परदेशात राहून मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी ही मंडळी मनापासून प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या समस्त मराठी भाषिकांनीही आपली मातृभाषा व मराठी संस्कृती चिरकाल टिकून राहण्यासाठी संकल्प करू या, असे आवाहन ‘विदेशातील मराठीचा जागर’ या परिसंवादाच्या समारोपप्रसंगी मुकुंद कानडे यांनी रविवारी येथे केले.
या परिसंवादात अनिल नेने (लंडन,) संतोष अंबिके (सिंगापूर), हसनजी चौगुले (कतार), मंदार जोगळेकर (अमेरिका) हे सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
मातृभाषा टिकविण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याचा संकल्प करून तो सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया, असेही कानडे म्हणाले.
नेने यांनी सांगितले की, खरी श्रीमंती आपल्या संस्कृतीत असून ‘साहित्य’ हा संस्कृतीमधील महत्त्वाचा घटक आहे. हे साहित्य समृद्ध करण्यासाठी व त्यातून येणाऱ्या श्रीमंतीला अर्थ देण्यासाठी तुमच्या मदतीने आम्हीही प्रयत्न करू.
हसनजी चौगुले म्हणाले की, परदेशात राहूनही मराठीची ओढ कायम आहे. मराठीला आम्ही कधीही परके मानले नाही. कतारमध्ये आम्ही मराठी शाळा सुरू केली आहे, तर कितीही दूर राहिलो तरी मराठी भाषेशी असलेली नाळ तोडता येत नाही. अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्र मंडळे असून विविध उपक्रमांच्या माध्यमांतून ही मंडळे मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंटरनेट, ब्लॉग आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा मराठी भाषेसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, असे मंदार जोगळेकर म्हणाले.
भाषा टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या संवर्धनसाठी एकमेकांशी संपर्क आणि संवाद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाषेची शुद्धता टिकवून ठेवली पाहिजे आणि ती फॅशनेबल होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे संतोष अंबिके म्हणाले.