अवघे सव्वाशे वर्षे वयोमान
(प्रवीण विनायक प्रधान)
चां. का. प्रभू प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फंड, बडोदे या संस्थेला १२५ वर्षे पूर्ण झाली. सातत्याने १२५ वर्षे ही संस्था ज्ञातीसाठी तळमळीने कार्य करीत आहे. कै. दिवाण बहादूर वासुदेव महादेव समर्थ यांनी १८८८ साली या संस्थेची स्थापना केली.
‘‘आमचे चुलत पणजे कै. दिवाण बहादूर वासुदेव महादेव समर्थ यांनी १८८८ साली स्थापन केलेल्या ज्ञातीच्या शैक्षणिक संस्थेच्या १२५ शतसांवत्सरिक रजत जयंती कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी व आमचे कुटुंबीय आभारी आहोत. या संस्थेच्या १५० वर्षीय कार्यक्रमालासुद्धा आम्ही उपस्थित राहू,’’ असे भावपूर्ण उद्गार लेफ्ट. ब्रिगेडियर डॉ. सुरेश समर्थ यांनी काढले. संस्थेच्या दिमाखदाररीत्या सजवलेल्या गांधीनगरगृह येथील कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून त्यांचे बंधू दिनेश यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नियोजित स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. २१ व्या शतकातील शैक्षणिक गरजा विचारात घेऊन २००० सालापासून संस्थेने आयोजिलेल्या विद्याथ्र्योपयोगी उपक्रमांची त्यांनी थोडक्यात माहिती दिली. कार्यकारी सदस्य प्रशांत गुप्ते यांनी डॉ. सुरेश समर्थ, अविनाश पालकर यांनी अतिथीविशेष दिनेश समर्थ, उपाध्यक्ष प्रकाश दिघे यांनी आमंत्रित नगरसेविका सीमा मोहिले, सांसद बाळकृष्ण शुक्ल यांचा परिचय करून दिला. कार्यवाह प्रकाश सुळे यांच्या हस्ते डॉ. समर्थ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व आमंत्रित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष नितीन देशपांडे यांच्या हस्ते शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सहकार्यवाह कविता प्रधान यांनी विजयी स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करून, प्रमुख अतिथी, तसेच विशेष अतिथी यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या रजतजयंती कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेचे प्रमुख अतिथींच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या आकर्षक स्मरणिकेत कै. दि. बा. वासुदेव समर्थ यांच्याविषयी माहितीपूर्ण लेख, विद्यार्थोपयोगी शैक्षणिक माहिती, तसेच संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचे मनोगत असून, त्यांचे संकलन, संपादक अरुण धारकर यांनी केले आहे. शिरीष महागावकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा सुळे यांनी केले. संस्थेचे उल्लेखनीय शैक्षणिक विद्यार्थोपयोगी उपक्रम, तसेच देणगीदारांशी सतत संपर्क यामुळे संस्थेला प्रोत्साहित आर्थिक देणग्या या वेळी मिळाल्या.
या कार्यक्रमाअंतर्गत आयोजिलेल्या ऋषीकेश रानडे व त्यांचे गायक सहकारी यांच्या संगीतमय जादूने उपस्थित प्रभावित झाले. सर्व गायक-वादक कलाकार, तसेच संयोजक कमलेश भडकमकर यांचा सुजीत प्रधान व कविता प्रधान यांनी सत्कार केला.
पूर्वाचल प्रांतीय अधिवेशन संपन्न
(शिल्पा कुलकर्णी)
बृहन्महाराष्ट्र नवी दिल्ली २०१३ चे पूर्वाचल प्रांतीय अधिवेशन कोलकाता येथे महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने मंडळातर्फे विविध अधिवेशन उत्तम प्रकारे पार पडावे या हेतूने विविध समित्यांची नियुक्ती केली होती.
स्वागतगीतानंतर, दीप प्रज्वलन, तसेच सरस्वती वंदना सादर करून अधिवेशनाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अतिथी परिचय करीत, त्यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. पूर्वाचल प्रांतातील मराठी गतिविधींचा परामर्श या निमित्ताने घेण्यात आला. याच वेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा परिचय करून देताना पूर्वाचल प्रांतीय अधिवेशन आयोजित करण्याचा उद्देशही स्पष्ट करण्यात आला. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या प्रतीकचिन्हाचे वितरणही करण्यात आले. आभारप्रदर्शनाने पहिल्या सत्राची सांगता झाली. उद्घाटन समारंभानंतर चहापान व त्यानंतर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ ते १ पर्यंत स्वामी विवेकानंदांचे संगठन कौशल्य याविषयी विचार ऐकण्याची संधी उपस्थित सदस्यांना मिळाली. या वेळी वक्ते व अतिथींना प्रतीकचिन्हे देऊन त्यांना गौरविण्यात आले. आभारप्रदर्शनाने या सत्राची समाप्ती झाली. त्यानंतर सर्वच पाहुण्यांनी सहभोजनाचा लाभ घेतला. विविध ठिकाणांहून आलेल्या प्रतिनिधींना एकमेकांचा परिचय करून देण्याची संधी लाभली. जेवणानंतर प्रमुख कार्यक्रम म्हणजे संस्थांचा व सदस्यांचा परिचय होय. उपस्थित संस्थांच्या सदस्यांचा व संस्थांचा या वेळी परिचय करून देण्यात आला. परिचय करून देताना त्या संस्थाप्रमुखांना फूल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना आपल्या संस्थेविषयी माहिती देण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. त्याच वेळी अधिवेशनात सक्रिय सहयोग देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही परिचय करून सन्मान करण्यात आला. त्यात बी. एम. एम. पदाधिकारी, विभागीय कार्यवाह इत्यादींचा समावेश होता. उपस्थित अतिथी, तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळांचे कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. अल्पोपहाराने या एकदिवसीय पूर्वाचल प्रांतीय अधिवेशनाची सांगता झाली.
अशी रंगली रंगदक्षिणी २०१३
(उल्का दिलीप कुलकर्णी)
महाराष्ट्र मंडळ बंगळुरू येथे एकांकिका स्पर्धा घेण्यात आल्या. विविध मंडळांनी १० एकांकिका सादर केल्या. बंगळुरूमधील नाटय़प्रेमींना ही एक मेजवानी होती. जवळजवळ सर्व एकांकिकांच्या विषयांतून वर्तमानातील घडामोडींचे पडसाद जाणवले. त्यामुळे मन कुठेतरी उदास विचारांच्या गर्तेत जात होते, पण शेवटच्या ‘वात्सल्य’ने मूड एकदम बदलला. तो आनंद घेत घेतच आम्ही घरी परतलो. कलाकारांचा दांडगा उत्साह, अभिनय, मेहनत, जिद्द त्यांच्या सादरीकरणात दिसत होती. प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शन, बालकलाकार अशी भरघोस बक्षिसेही देण्यात आली. पुढच्या वर्षीपासून नवीन संहितेला बक्षीस ठेवावे आणि रंगदक्षिणी ही रंगभारतीइतकी विस्तृत व्हावी ही परीक्षकांची सूचना स्वागतार्ह वाटली. संयोजकांचे नियोजन शिस्तबद्ध तितकेच आपुलकीचे होते. संपूर्ण कार्यक्रम उत्तमच झाला. तरीही एक गोष्ट मनाला रुचली नाही. म्हणूनच सांगावेसे वाटते की, ‘नातं’मधल्या बालकलाकाराला किमान उत्तेजनार्थ बक्षीस द्यायला हवं होतं. मोठय़ांच्या दुनियेत पाऊल टाकताना आपले स्वागत होतंय याचा आनंद त्यास अनुभवावयास मिळाला असता.