राज्यातील बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी बिझनेस प्लॅन तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा प्रतिनिधी पणन महामंडळावर घेण्याची घोषणा राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी असणारी पेन्शन योजना पणन महामंडळाकडे हस्तांतरित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या वतीने राहाता येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कर्मचारी मेळाव्यात मंत्री विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राहाता बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडू, बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे, कार्याध्यक्ष भरत पाटील, पणन महामंडळाचे उप सरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर, पणन उपसंचालक शेषराव चव्हाण आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, केंद्र सरकारचा मॉडेल अ‍ॅक्ट लागू झल्याने खाजगी बाजार समित्या सुरु होत आहेत. बाजार समित्यांमध्ये यापुढे हमाल, व्यापारी व आडते यांच्या मक्तेदारीमुळे बाजार समिती बंद राहिल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समित्यांनी धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावेत. या वर्षी या केंद्रातून ५० लाख टन धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जादा भाव देण्याची स्पर्धा बाजार समित्यांनी निर्माण करावी.
कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देऊन त्यांच्या शेती मालाची व्यवस्थित देखरेख केल्यास बाजार समित्या निश्चितच पुढे जातील असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, बाजार समिती कर्मचारी संघाची पेन्शन योजना पणन महामंडळ चालवणार असून बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांची  मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत बजार समित्यांचे सक्षमीकरण होणार नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मंत्री विखे यांनी सांगीतले. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांनी प्रास्तविक व स्वागत करुन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या. पणन महामंडळचे उप सरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांचेही या वेळी भाषण झाले.