चांगभलंचा जयघोष, भंडारा-खोबऱ्यासह अक्षतांची उधळण

श्री क्षेत्र पाल (ता. कराड) येथे श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा येळकोट-येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष, भंडारा-खोबऱ्याच्या अक्षतांसह वेद-मंत्रांच्या जयघोषात गोरज मुहूर्तावर भक्तिमय वातावरणात पार पडला.

खंडोबा व म्हाळसा यांचे विवाह सोहळ्यात खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या. दुपारी २ वाजता खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले.

मंदिरातील सर्व विधी आटोपून देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटास बांधून अंधार दरवाजा जवळ आले. याठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. मानकऱ्यांच्या फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासनकाठय़ा, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले.

खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा अनुभवण्यासाठी तारळी नदीच्या तीरावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाल नगरीचे आसमंत भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळे धमक झाले होते. मंदिर परिसर, वाळवंटातून ही शाही मिरवणूक हळूहळू पुढे सरकत मारुती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली.

या वेळी खंडेरायाच्या जयजयकाराने सारा परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले. पारंपरिक पद्धतीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा दिमाखात पार पाडला.