महापालिकेच्या वतीने हरित कुंभ अभियानाचा प्रसार करण्यासाठी शुक्रवारी आयोजित ‘महापौर सायक्लोथॉन’मध्ये सुमारे १२९ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असा सुमारे ७५ किलोमीटरचा प्रवास या उपक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आला. शुक्रवारी सकाळी सायक्लोथॉनला सुरुवात झाली. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी झेंडा दाखविला. या वेळी महापौरांनी महापालिकेच्या क्रीडा धोरणाच्या माध्यमातून दरवर्षी महापौर सायक्लोथॉनचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी व्यासपीठावर विशाल उगले, किरण चव्हाण, नंदू देसाई, राजेंद्र निंबाळते, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, अविनाश खैरनार आदी उपस्थित होते. श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गाचा नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, या हेतूने अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी महापौरांपुढे या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सायक्लोस्त आणि इको ड्राइव्ह या संस्थांचे प्रतिनिधी विशाल उगले, किरण चव्हाण, नंदू देसाई, राजेंद्र निंबाळते यांच्याशी चर्चा करण्यात येऊन सायक्लोथॉनला अंतिम स्वरूप देण्यात आले. या सायक्लोथॉनमध्ये सुमारे १२९ जणांनी सहभाग घेतला. त्यापैकी ९८ जणांनी ७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. ब्रह्मगिरीवर चढताना आणि उतरताना सायकल उचलून घ्यावी लागली. सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेली फेरी दुपारी तीन वाजता संपली.