राजकारणातील गुरूशिष्यांच्या काही जोडय़ा पक्षीय मतभेदापलिकडे आयुष्याच्या अखेपर्यंत टिकतात. कटूना न राहता टिकलेल्या अशा जोडय़ांपैकी गुरूशिष्याचे एक नाते म्हणजे शरद पवार-दत्ता मेघे यांचे दिले जाते. परवाच्या भेटीत या जोडीने परस्परांच्या आरोग्याची विचारपूस करून जपलेल्या स्नेहाला उजाळा दिला.
विदर्भाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येऊन गेलेले राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दौऱ्यात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात क्रिकेटही आले. या त्यांच्या दौऱ्यात त्यांची व दत्ता मेघेंची भेट होणार काय, हा उत्सुकतेचा भाग ठरला होता. यापूर्वीच्या दौऱ्यात भेटी घडल्या होत्या. यवतमाळला जातांना पवार वाटेत सावंगीच्या गणेश दर्शनासाठी येण्याचीही अटकळ बांधण्यात आाली होती, पण तसे झाले नाही. शेवटी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात पवार-मेघे यांची गाठ पडली. या कार्यक्रमापूर्वी प्रफु ल्ल पटेल, अनिल देशमुख व अन्य चार-पाच नेत्यांच्या उपस्थितीत पवार यांनी मेघेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. पायावरील सूज, रक्तदाब, रोजची औषधी याबाबत त्यांनी आस्थेने विचारपूस केली. पवार हे मेघेंना राजकारणात गुरूवर्य असले तरी मेघे हे पवारांना तीन वषार्ंनी मोठे म्हणून प्रकृतीचा हा वेगळा पैलू चर्चेत प्रथम आला. थोडक्यात झालेली ही भेट असली तरी पवार-मेघेंचे ओलाव्याचे संबंध मधून-मधून उजळतातच. मध्यंतरी पवार हे रुग्णालयात दाखल असतांना मेघे कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली होती.
ताजे उदाहरण म्हणजे, पवारांच्या आगामी १२ डिसेंबरच्या वाढदिवसाचे देता येईल. यावर्षी दिल्लीत वाढदिवसानिमित्य १० डिसेंबरला एका खास कार्यक्रमाचे आयोजन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याचे खास पत्र मेघेंना मिळाले आहे, तसेच खासदार सुप्रियाताईनी दूरध्वनीवरून मेघेंना अगत्याचे निमंत्रण देऊन ठेवले आहे. या माहितीच्या अनुषंगाने या नात्यातील एक रेशीम आठवण ऐकायला मिळाली. पवारांच्या वाढदिवसानिमित्य मेघे परिवारातर्फे दरवर्षी पवारांना शिवलेला सूट पाठविला जातो, तसेच प्रतिभाताई पवार यांचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी म्हणजे, १३ डिसेंबरला येतो. त्याची आठवण ठेवून प्रतिभाताई व सुप्रियाताई यांच्यासाठी साडीचोळीचा खास अहेर मेघेंकडून पाठविला जातो. मेघे ही बाब अत्यंत खाजगी म्हणून स्वत: सांगत नाहीत, पण विचारल्यावर सूचक हास्य करतात. पवार व मेघे यांचे कपडे शिवणारा मुंबईचा टेलर हा पुन्हा एक दुवा आहेच. अत्यंत खाजगी पातळीवरचे हे संबंध जाहीरपणे पुढे आले नाहीत. मात्र, पवारांच्या विदर्भ दौऱ्यात मेघेंचे काही क्षण नेहमीच राखीव राहिलेले आहेत. पक्षांतर्गत पातळीवर मात्र जाहीर स्वरूपात कटूता दिसून आली. मेघेंकडे जाणाऱ्या राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या नेत्यांना वाळीत टाकले जाण्याचा प्रकार काही बाबतीत घडला. जो मेघेंकडे फि रकेल त्यांच्यासाठी पक्षाची दारे धाडकन बंद करण्याची टोकाची भूमिका काही राकॉं नेत्यांनी घेतली. पक्षाच्या दुसऱ्या फ ळीने केलेल्या अवहेलनेतूनच मेघेंनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर झाले होते. सात वर्षांंपासून हा पक्षीय दुरावा राहिला. पण दैवत बदलले नाही. अनेक कार्यक्रमातील भाषणात मेघेंनी शरद पवार हेच आपले राजकीय गुरू असल्याचे न संकोचता उल्लेखिले गेले. आता मेघे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाण्यास ईच्छूक असल्याचे चर्चिले जात आहे. भाजपातर्फे उमेदवारी मिळण्यावर हा पुढचा राजकीय टप्पा अवलंबून असला तरी यासाठी पवारांचे मार्गदर्शन कामी येणार काय, अशा उत्सुकतेला परवाच्या पवार-मेघे भेटीने बळच मिळाले आहे.