शहरातील गुत्तेदार व मंत्री यांच्यात साटेलोटे असून दोघे एकमेकांच्या संगनमताने निकृष्ट कामे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार प्रा. सुनील धांडे यांनी केला. केंद्र व राज्य सरकार कोटय़वधींचा निधी नगरपालिकेसाठी देत असून, मंत्री व गुत्तेदार या निधीत भ्रष्टाचार करून नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहेत, असा आरोपही प्रा. धांडे यांनी केला.
बीड नगरपालिकेवर धांडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नारळी मोर्चा काढण्यात आला. स्वच्छ शहर सुंदर शहर असल्याच्या आविर्भावात पालिकेतर्फे कोटय़वधीची कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विकासाच्या नावाखाली बीडला भकास करणाऱ्या पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात रिक्षाचालकही वाहनांसह सहभागी झाले होते. माळीवेस-सुभाष रस्ता-साठे चौकमाग्रे आलेल्या नारळी मोर्चाचे पालिकेसमोर सभेत रूपांतर झाले.
प्रा. धांडे यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील गटारींची कामे, भाजी मंडईतील ओटय़ांची कामे बनावट करण्यात आली. कोटय़वधींचा निधी गुत्तेदारांच्या घशात घालण्याचे काम येथील मंत्र्यांकडून झाल्याचा आरोप त्यांनी केला. बीडला वळण रस्ता करू, रेल्वे आणू, उड्डाणपूल करू अशा घोषणा देऊन मंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. मोर्चात महिला आघाडीच्या रेखा फड, नितीन धांडे, शैलेश जाधव, राजू हंगरगे आदींसह कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी होते.