राज्यातील दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत..आठ ते नऊ महिन्यात आणेवारीचे नवीन निकष..उत्तर महाराष्ट्रातील २२ उपसा सिंचन योजना पुढील तीन महिन्यात कार्यान्वित..अशी एकापेक्षा एक आश्वासने महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना दिली.
जिल्ह्य़ातील सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समारोपानिमित्त रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अतिशय चिंतेची बाब असुन शासनस्तरावरुन अशा आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु समाजातील सर्व लोकांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पुढाघार घेण्याची आवश्यकता असल्याच मत खडसे यांनी व्यक्त केले. प्रकाशा, सारंगखेडा आणि सुलवाडे परिसरातील बंद पडलेल्या २२ उपसा सिंचन योजनाो तीन महिन्यातच कार्यान्वित केल्या जाणार आहेत. या तिन्ही लघु प्रकल्पामधील पाणी शेतकऱ्यांच्या कामी येत नसल्याने या अर्थसंकल्पात या सहकारी उपसा सिंचन योजनांसाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात आणेवारी ठरविण्याची ब्रिटीशकालीन पद्धत त्रासदायक ठरत असल्याने यात सुधारणा करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही गठीत झाली आहे. या समितीने अहवाल शासनास सादर केला असून आठ ते नऊ महिन्यात नवीन आणेवारीची पद्धत जाहीर करण्याचा प्रयत्न सरकारचा राहील, असे आश्वासनही खडसे यांनी दिले.