बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या सहा वधूंचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बालविवाह प्रकरणात नगराध्यक्षांसह तीन जणांविरुद्ध बालविकास प्रकल्प अधिकारी तथा तालुका बाल संरक्षण सचिव यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मेहकर येथे २८ एप्रिलला यशवंत मैदान येथे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण २४ मुस्लीम समाजातील जोडप्यांचा विवाह पार पडला. परंतु, या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह झाल्याची तक्रार अ‍ॅड. उल्हासराव गणपतराव जाधव (रा. मेहकर) यांनी जिल्हाधिकारी व बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे केली. त्या तक्रारीनुसार सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांच्या वयाची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा तालुका बाल संरक्षण सचिव यांना दिल्या. विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी मेहकरचे नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे स्थानिक नेते कासम पिरू गवळी यांच्यावर होती. दरम्यान, २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांतील वधूंचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यामध्ये तक्रारदाराने सादर केलेल्या चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. त्यात वधू-वरांचे नावही घोषित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी घोषित केलेल्या वधूंच्या वयाची तपासणी करण्याकरिता संबंधित शाळेत पत्रव्यवहार करून माहिती मागितली असता सहा वधूंचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे उघड झाले.

बालविवाह करणारे, बालविवाह विधिपूर्वक लावणारे तसेच बालविवाहास चालना देणारे सर्वजण दोषी असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरिता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कासम पिरू गवळी, जंगली भिराव रेघीवाले, हसन रहेमु खलीताऊ (रा. मेहकर) या तिघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.