18 September 2020

News Flash

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल तीव्र प्रतिक्रिया

उल्लेखनीय म्हणजे, वायपीएसमधील या घटनेच्या विरोधात असंतोषाचा इतका उद्रेक झाला आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

यवतमाळ कडकडीत बंद, शाळेवर दगडफेक

येथील जवाहलरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालित इंग्रजी माध्यमाच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील सहा वर्षे वयाच्या  विद्यार्थिनीचा लंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या याच शाळेतील यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर या दोन शिक्षकांना अटक झाल्यावर त्यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी करून महिलांसह हजारो नागरिकांनी गुरुवारी स्वयंस्फुर्तीने काढलेल्या भव्य मोर्चाने सारे शहर दणाणले. या घटनेच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी केलेल्या यवतमाळ बंदच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक संस्थांसह चहाटपऱ्या, पानठेले आणि लहानमोठे व्यवसायही कडकडीत बंद होते.

उल्लेखनीय म्हणजे, वायपीएसमधील या घटनेच्या विरोधात असंतोषाचा इतका उद्रेक झाला आहे की, सर्व जातीधर्माचे लोक या मोर्चात सहभागी झाले होते. डॉक्टर, वकील, प्राध्यापक अभियंत्यांपासून व्यापारी आणि अगदी सामान्य विक्रेते, सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थ्यांंचाही यात समावेश होता. शिवाय, भाजप, सेना, राष्ट्रवादी, कांॅग्रेस, मनसे यांच्यासह विविध पक्षांचे असंख्य कार्यकत्रेही मोर्चात होते. विशेषत मुस्लीम बांधव आणि महिलाही कधी नव्हे एवढय़ा संख्येने सहभागी झाल्याचे चित्र प्रथमच दिसले. अवाक् करणाऱ्या या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. संस्थाचालक माजी खासदार विजय दर्डा आणि सचिव किशोर दर्डा यांच्या निवासस्थानी, तसेच वायपीएस शाळेभोवती तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, मोर्चा आटोपल्यावर काही लोक वायपीएस शाळेच्या भव्य इमारतींलगतच्या या संस्थेच्या वीणादेवी दर्डा नर्सरी शाळेच्या इमारतीवर चालून गेले आणि तेथे त्यांनी जोरदार दगडफेक करून राग व्यक्त केला. आरोपींविरुध्द भांदविच्या ३७६ कलमाखाली गुन्हा नोंदवण्याची मोर्चाची मागणी होती. पोलिसांनी आरोपी शिक्षकांविरुध्द बाललंगिक संरक्षण कायदा कलम ८, १०, १२, तसेच भांदविच्या ३५४ अ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, त्यामुळे संतप्त जनतेचे समाधान झाले नाही. आरोपी शिक्षक यश बोरुंदिया वायपीएसमध्ये संगीत शिक्षक आहे. तो नृत्यकला शिकविण्याचे वर्गही घेतो आणि शहरातील अनेक महिलांची त्यांच्याकडे शिकवणी आहेत. त्याच्याविरोधात संस्थेतील पालकांसह १२ पालकांनीही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार देविदास ढोले आणि त्यांच्या पोलीस ताफ्याने शाळेतून ठाण्यात आणून आरोपींना अटक केली.

अधिक माहितीनुसार पीडित मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली होती. तिला महिला डॉक्टरांनी तपासल्यावर तिचा लंगिक छळ झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी वर्तवला, ही बाब पालकांना समजल्याने संतापाची लाट उसळली.

‘संस्थेवरही कारवाई होऊ शकते’

बचत भवनात खचाखच भरलेल्या पालक महिलांच्या सभेला संबोधित करताना जिल्हाधिकारी सचिंद्रप्रतापसिंह म्हणाले की, कोणीही दोषी असो त्याच्यावर कारवाई होईलच. मात्र, महिलांनी जेव्हा संस्थाचालक दर्डावर कारवाईची मागणी केली तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह म्हणाले की, बाललैंगिक संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास संस्थाचालकांवरही कारवाई केली जाईल. या सभेत १० वर्षांच्या एका मुलीने व्यासपीठावर येऊन ध्वनिक्षेपक हाती घेऊन ‘आम्हाला संरक्षण द्या. आम्ही शाळेत शिकायचे कसेठ, असा प्रश्न करून जिल्हाधिकाऱ्यांनाही अनुत्तरित केले. शेवटी संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आरोपींविरुध्द तात्काळ कारवाई – विजय दर्डा

दरम्यान, दोन्ही आरोपी शिक्षकांना पोलिसांनी अटक करताच संस्थेने तात्काळ त्यांना सेवामुक्त केले आहे. ही अधिकतम शिक्षेची कारवाई असून आम्ही पोलिसांना कळवल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी गुरुवारी लोकसत्ताला सांगितले. पोलीस जी काही कारवाई करतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील, असे संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:22 am

Web Title: minor school girl raped in yavatmal district
Next Stories
1 शासनाच्या संकेतस्थळावर अद्याप एकनाथ खडसे मंत्रीच
2 अमोल बैस यांच्या ‘त्या’ छायाचित्राला टपाल तिकीटावर आभाळ‘माया’ लाभणार
3 वरूड तालुक्यात ‘वॉटर कप’ विजेत्याची उत्कंठा!
Just Now!
X