05 April 2020

News Flash

वजाबाकीच्या राजकारणामुळे राणेंची कोंडी

कोकणातील सर्वच राजकीय पक्षांबाबत सातत्याने वजाबाकीचे राजकारण केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुरती कोंडी झाली आहे.

| April 12, 2014 01:21 am

कोकणातील सर्वच राजकीय पक्षांबाबत सातत्याने वजाबाकीचे राजकारण केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुरती कोंडी झाली आहे.
  विद्यमान खासदार निलेश हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकवार कॉंग्रेस आघाडीतर्फे उभे राहिले असून त्यांची मुख्य लढत महायुतीचे उमेदवार आमदार विनायक राऊत यांच्याशी आहे. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षांच्या खासदारकीनंतर ही निवडणूक निलेश यांना सोपी जाईल, अशी कॉंग्रेसची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र विरोधकांप्रमाणेच मित्र पक्षांनीही असहकाराचे धोरण अवलंबल्यामुळे राणे पिता-पुत्रांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
कॉंग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मुख्य मित्र पक्ष असून गेल्या काही वर्षांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये या पक्षाने चांगले बस्तान बसवले आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, रत्नाागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर या तिघांनाही राणेंनी दुखावून ठेवले आहे. राऊत यांच्याशी सामंतांनी बंद खोलीत गुप्त चर्चा केल्याचा आरोप गेल्या महिन्यात खासदार निलेश यांनी पत्रकार परिषदेत केल्याने  सामंतांसह त्यांचे कार्यकर्ते अतिशय दुखावले. अखेर नारायण राणे यांनाच त्यांची भेट घेण्यासाठी धाव घ्यावी लागली. त्यामुळे सामंत हे निलेश यांच्या सभांना हजेरी लावत असले तरी जाधव आणि केसरकर फिरकलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तर संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस संपवण्याच्या दिशेने राणे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फळेही त्यांना भोगावी लागत आहेत. पक्षाने काढले तरी बेहत्तर, पण निलेश यांचा प्रचार करणार नाही, अशा निकराच्या भूमिकेपर्यंत राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते आले आहेत.
सामाजिक विरोधही उग्र
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चिपी विमानतळ, खाण उद्योग, धरण प्रकल्प, सी वर्ल्ड इत्यादी विविध प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यापैकी कोणत्याही प्रकल्पाच्या व्यवहारामध्ये, विशेषत: भूसंपादनामध्ये पारदर्शीपणा नसल्यामुळे अशा सुमारे १५ प्रकल्पांच्या विरोधातील संघटनांनी समन्वय समिती स्थापन करुन या निवडणुकीत कॉंग्रेसविरोधी मतदानाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मुख्य रोख केंद्र किंवा राज्य सरकारपेक्षा राणे यांच्यावरच आहे. जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प विरोधातील मच्छिमारांनीही गेल्या बुधवारी राणे यांना भेटण्यासही नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 1:21 am

Web Title: minus politics traps narayan rane in ratnagiri
टॅग Narayan Rane
Next Stories
1 जालना मतदारसंघात ५२ मतदान केंद्रे संवेदनशील
2 मतदान कार्डाशिवाय इतर ओळखपत्रेही ग्राहय़ धरणार
3 ‘अशोक चव्हाण निर्दोष, त्यांच्यावरचे आरोप खोटे’!
Just Now!
X