लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाला मुंबई- पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरातील स्क्रीन मिळत नसल्याचे समोर आले असतानाच आमदार नीतेश राणे यांनी या वादावर मराठी माणसाला एक सल्ला दिला आहे. ‘स्वत: चे सिनेमागृह उभे करुन मराठी माणसांनी दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद केले पाहीजे’, असे त्यांनी म्हटले आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट पाहाण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मुंबई- पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरातील स्क्रीन मालकांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी देवगडमधील स्टारलाइट सिनेमा येथील शो टाइमचे स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केले आहे. देवगडमधील स्टारलाइट सिनेमा येथे ‘सिम्बा’ आणि ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या दोन्ही चित्रपटांचे शो आहेत. ‘सिम्बा’चे दुपारी 12 आणि तीन वाजताचा शो आहे. तर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाला प्राइम टाइम देण्यात आला आहे. या चित्रपटाचे शो संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ वाजताचे आहेत.

या ट्विटमध्ये नीतेश राणे म्हणतात, आमच्या देवगडमध्ये ‘सिंबा’बरोबर ‘भाई’ पण गाजणार! दुसऱ्यांचे फोडण्यापेक्षा स्वत:चे सिनेमागृह उभे करुन मराठी माणसांनी दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद केले पाहिजे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’चे मुंबई आणि उपनगरातील जवळपास ११८ मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर शो सुरू आहेत. मात्र ४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘भाई’ चित्रपटाला महाराष्ट्रातील दोन्ही महत्त्वाच्या शहरात घरघर लागली आहे. दक्षिण मुंबईतील १८, पश्चिम मुंबईत २० आणि नवी मुंबईतील ७ अशा एकूण ४५ चित्रपटातगृहात ‘भाई’चे शो आहेत. हा आकडा ‘सिम्बा’ला देण्यात येणाऱ्या स्क्रीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुण्यातही हेच चित्र आहे. पुण्यातील एकूण २१ हून अधिक मिल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर ‘सिम्बा’चे वेगवेगळ्या वेळेत शो ठेवण्यात आले आहेत. तर ‘भाई’साठी हा आकडा कमी आहे पहिल्याच दिवशी १९ आणि मग १७ चित्रपटगृहात ‘भाई’ दाखवण्यात येणार आहे.