जिल्हा नियोजन समितीचा ८ कोटींचा अखर्चीत निधी परत द्यावा, या मागणीसाठी आमदार मीरा रेंगे यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी उपोषण करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. परभणी जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी मोठय़ा प्रमाणात अखर्चीत राहिल्याने परत गेला. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासावर परिणाम झाल्याचे मत आमदार रेंगे यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीचा ८ कोटींचा अखर्चीत निधी परत द्यावा, तसेच पाथरी येथील हिंदू स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे, पाथरी मतदारसंघातील शेतरस्ते व गोदावरी नदीकाठावरील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, मुद्गल बंधाऱ्यातील पाणी सोडताना आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, पाथरी मतदारसंघातील पुनर्वसनाची कामे पूर्ण करावीत आदी मागण्यांसाठी आमदार रेंगे यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत सत्ताधाऱ्यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रेंगे यांची भेट घेऊन या सर्व मागण्यासंदर्भात संबंधितांशी बोलून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पाटील यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून पाथरी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढून टाकण्याचेही आदेश दिले. त्यानंतर उपोषण मागे घेतल्याची माहिती आमदार रेंगे यांनी दिली.