शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयात ‘शिवथाळी’ योजनेला गणतंत्र दिनाच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते केंद्रांचे उद्धाटन करत शिवथाळी योजनेची सुरुवात करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्तेदेखील केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र यावेळी एका गोष्टीमुळे जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल केलं जात आहे. उद्घाटन केल्यानंतर शिवथाळीचा आस्वाद घेत असताना जितेंद्र आव्हाड यांनी सोबत पाणी पिण्यासाठी बिस्लेरी बाटली घेतली होती. बिस्लेरी बाटलीची किंमत शिवथाळीपेक्षा जास्त असल्याने जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल केलं जात आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनीदेखील यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस असा टोला त्यांनी लगावला आहे.

गोरगरिबांसाठी सवलतीच्या दरात भोजन मिळावे म्हणून शिवसेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दहा रुपयात शिवथाळी योजना जाहीर केली होती. शुक्रवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेच्या तयारीचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्य़ांच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून घेतला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नाही. मुख्यत्वे गोरगरीबांसाठी ही योजना आहे. नैतिकतेच्या आधारावर तिचा लाभ घेतला जावा, असे शासनाला अभिप्रेत आहे. थाळीत पोळी, भाजी, वरण, भात आदींचा समावेश राहील. दुपारी १२ ते दोन या वेळेत सर्वसामान्यांना शिवभोजनाचा लाभ घेता येईल.

अजित पवारांनी नाकारली शिवथाळी… दिलं योग्य कारण!
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात पार पडला. पण, यावेळी अजित पवार यांनी शिवथाळी नाकारली. पण, असं करण्यामागचं योग्य कारणही त्यांनी दिलं.

उद्घाटनानंतर दादा थाळीची टेस्ट करा असा, आग्रह काही पत्रकारांनी केला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत शिवभोजन थाळी नाकारली. ते म्हणाले की, ‘मी जेवलो तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. अजित पवार यांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला.’ अजित पवारांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार पुढे म्हणाले की, पण इतक्या लवकर मी जेवत नाही, आरे मी दीक्षित डायटवर आहे.