“काम केल्यानंतरही लोक आम्हालाच प्रश्न विचारतात. ५० ते ६० वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची आज स्थिती काय आहे ते पाहा ? लाटा आल्यानंतर अशी स्थिती होते. २०१४ मध्ये मायावतींचा एक खासदार निवडून आला नाही पण प्रश्न आम्हालाच विचारले जातात” असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वर्धापन दिन आहे. ते विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. “दिल्लीत ७० पैकी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ६३ जागांवर डिपॉझिट जप्त झाले. देशावर राज्य करणाऱ्या पक्षाची आज अशी स्थिती आहे. लाटांमध्ये अनेक पक्षांना धक्के बसतात” असे राज ठाकरे म्हणाले.

“यशाला बाप खूप आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. कामावर मतदान होत ? हा या देशात प्रश्नच आहे” असेही राज म्हणाले. “या प्रतिकुल परिस्थितीत आपल्याला एका गोष्टीचा खूप आनंद आहे. इतके चढ-उतार पाहिल्यानंतरही तुम्ही माझ्या बरोबर राहिलात याचा आनंद आहे. पराभवानंतरही इतकी माणस येतात कुठून हा प्रश्न अनेकांना पडतो” हेच मनसेचे यश असल्याचे राज म्हणाले.