महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज महाराष्ट्र दिन. आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. आपली जबाबदारी जागण्याचा हा दिवस असल्याचे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंचे ट्विटरवरील हे पहिले ट्विट आहे.

महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पहिले ट्विट केले. यात ते म्हणतात, आज महाराष्ट्र दिन. आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांची आक्रमक आणि तडफदार शैली सर्वश्रुत आहे. त्यांच्या व्यंगचित्रांचे फटकारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर स्वतःचे पेज सुरु केले होते. तर सोमवारी राज ठाकरे यांनी ट्विटरवरही दिमाखात प्रवेश केला होता. ट्विटरवर अवघ्या २४ तासांच्या आत राज ठाकरे यांच्या फॉलोअर्सची संख्या सात हजारांच्या वर पोहोचली आहे.