05 July 2020

News Flash

‘निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात माणुसकी सोडू नका’ ‘राज’पुत्राचं महाराष्ट्राला पत्र

अमित ठाकरेंनी केलेलं आवाहन अत्यंत महत्त्वाचं

निसर्ग या चक्रीवादाळाचा धोका हा महाराष्ट्रावर आहे. त्याच अनुषंगाने सगळ्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. आधीच करोनाशी लढणाऱ्या महाराष्ट्राला आता आणखी एका संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पुढचे दोन दिवस म्हणजेच २ आणि ३ जूनला महाराष्ट्रात निसर्ग या चक्रीवादळाचा धोका आहे. एनडीआरएफची पथकंही तैनात करण्यात आली आहेत. अशात आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्टही करण्यात आलं आहे.

काय म्हणतात अमित ठाकरे पत्रात?

प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो,

करोना संकटावर मात करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतानाच आणखी एक नवं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलंय. हे संकट आहे, चक्रीवादळाचं.

या चक्रीवादळाच्या अतिवेगवान वाऱ्यामुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, रस्त्यावरच्या प्राण्यांना तुमच्या इमारतीच्या आवारात आश्रय घेऊ द्या, त्यामुळे ते सुरक्षित राहतील. मला पूर्ण कल्पना आहे की, अनोळखी लोकांना इमारतीत घेणं आपल्यापैकी अनेकांना शक्य होणार नाही. पण एकदा का हे चक्रीवादळाचं संकट निघून गेलं की, आपण सर्वांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करायला हवी. कुणाला जेवण, तर कुणाला औषधं उपलब्ध करुन द्यायला हवी.

एक जबाबदार नागरिक म्हणून या संकटकाळात आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य असेल ते आपण करायला हवं.

मला विश्वास आहे की, आपला एक लहानसा प्रयत्नही एखाद्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो.

अमित ठाकरे यांनी लिहिलेलं हे पत्र निश्चितच महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला जमेल तितकी मदत करावी असं आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला केलं आहे. फक्त माणसांविषयीच नाही तर भटक्या प्राण्यांविषयचीही माणुसकी सोडू नका असंही आवाहन अमित ठाकरे यांनी केलं आहे. अमित ठाकरे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 11:37 pm

Web Title: mns leader amit thackeray wrote a letter to maharashtra about nisarga cyclone scj 81
Next Stories
1 बुलडाणा जिल्ह्यातील नऊ जणांची करोनावर मात
2 सोलापुरात करोनाबाधितांचा हजाराचा टप्पा पार; ९० मृत्यू
3 लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगार सक्रिय, जेजुरीत फसवणुकीचे प्रकार
Just Now!
X