पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. महाराष्ट्रात काँग्रेसने पुकारलेल्या या बंदमध्ये मनसेचाही सहभाग होता. तसेच इतरही पक्षांनीही सहभाग घेतला होता. दरम्यान आज औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दुचाकीला फाशी देत आंदोलन केले. पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत अशात दुचाकी ही फक्त शोभेची वस्तू झाली आहे असा आरोप करत मनसेच्या विद्यार्थी सेनेने आंदोलन केले.

औरंगाबादच्या क्रांती चौक भागात हे आंदोलन करण्यात आले. तसेच मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली. सरकारने इंधनाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला.