‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलली

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकण्याची चिन्हे असतानाच त्याने किंचितशी दिशा बदलली आहे. मात्र, वाऱ्यांची गती वाढलेली असल्याने राज्यात कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा परिणाम दिसतो आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाला सुमारे दोन दिवसांचा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ किंवा १५ जूनला राज्यात मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ अद्यापही तीव्र असून, ते गुजरातच्या पोरबंदरपासून दक्षिणेच्या दिशेला १३० किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ पुढील काळात उत्तर-पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता आहे. ते थेट गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्याने बुधवारी रात्रीपासून काही प्रमाणात दिशा बदलली असून, सद्यस्थितीत ते गुजरातच्या समुद्रावरून पाकिस्तानच्या दिशेने सरकताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्यांचा प्रतितास वेग सुमारे १०० ते ११० किलोमीटर असल्याने कोकण विभाग आणि गुजरात किनारपट्टीवर त्याचे पडसाद उमटत आहेत. कोकणासह मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत.

राज्यात कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवापर्यंत (१३ जून) मोसमी वारे पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवाह कमी झाला आहे. चक्रीवादळाची स्थिती निवळून पुन्हा मोसमी वाऱ्यांचे प्रवाह वाढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे १४ जूनपर्यंत प्रगती होऊन त्यानंतर मोसमी वारे राज्यात येऊ शकतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

कोकणात मुसळधार; विदर्भात उष्णतेची लाट

अरबी समुद्रातील चक्रीवादळाने राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम केला आहे. कोकणात पूर्वमोसमी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारीही कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

किनारपट्टीवरच पावसाची हजेरी

पुढील आठवडय़ात किनारपट्टी सोडल्यास उर्वरित महाराष्ट्र कोरडाच राहणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. १४ ते २० जून या कालावधीत फक्त किनारपट्टीवरच पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. नंतरच्या आठवडय़ात (२१ ते २७ जून)पावसाचा विस्तार उर्वरित महाराष्ट्रात होईल. जून महिनाअखेर पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.