मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरातून वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ‘ई-कॉमर्स’ आणि ‘टेलीमार्केटिंग’ कंपन्यांना सुगीचे दिवस आले असतानाच ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात दिल्लीपाठोपाठ सर्वाधिक ग्राहकांच्या तक्रारी या महाराष्ट्रातून आल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्राहकांनी २०१५-१६ या वर्षांत ३ हजार २१३ तक्रारी केल्या. दिल्लीतून ४ हजार ५४ तक्रारी आल्या. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातून तब्बल ५ हजार ७६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा हा आलेख वर्षांगणिक वाढता आहे. २०१३-१४ या वर्षांत राज्यातून ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांविरोधात ६६९ तक्रारी करण्यात आल्या होत्या. २०१४-१५ मध्ये तक्रारींची संख्या १८८१ वर पोहोचली होती. या वर्षांत देशभरातून २३ हजार ९२३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी महाराष्ट्रातून गेलेल्या तक्रारींचे प्रमाण १२ टक्के आहे. ‘ऑनलाईन शॉपिंग’ हा घरबसल्या खरेदीचा प्रकार सध्या राज्यात रूढ होत आहे. हव्या त्या वस्तूची इंटरनेटवरून माहिती घेऊन बाजारातील किमतीपेक्षा कमी किमतीत आणि घरपोच वस्तू मिळवण्याचे साधन त्यामुळे निर्माण झाले आहे. या नव्या विक्री पद्धतीमुळे ग्राहकांचा तसेच उत्पादक कंपन्यांनाही या पद्धतीमुळे लाभ होतो. मात्र, यात अनेक उणिवा देखील दिसून आल्या आहेत. ग्राहकांना सेवा देण्याच्या बाबतीत कुचराईच्या घटनाही वाढल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी केलेले उत्पादनच न मिळणे, सदोष उत्पादन मिळणे, वस्तूसाठी मोजलेली किंमत ती परत केल्यावर न मिळणे, सदोष सेवा, विलंबाने वस्तू मिळणे, जाहीर केलेल्या भेटवस्तू न मिळणे, दुरुस्तीनंतर उत्पादनच न मिळणे, असे ई-कॉमर्सवरील फसवणुकीचे प्रकार आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी केला की, कोठूनही ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतो. तसेच दिलेल्या तक्रारीची सद्यस्थितीही जाणून घेता येते. ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्री-स्तरीय अर्धन्यायिक व्यवस्था अस्तित्वात आहे. ग्राहकांना दोषपूर्ण वस्तू, सेवांमध्ये कमतरता आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित व्यापार, व्यवहारांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनला प्राप्त झालेल्या तक्रारी या संबंधित कंपन्यांकडे पाठवल्या जातात आणि ग्राहकांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या कंपन्या ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान करीत नाहीत, त्या कंपन्यांविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. आता ग्राहकांमध्येही जागरुकता वाढत चालल्याने तक्रारींची संख्या वाढली आहे.