कोपर्डीतील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर ‘अॅट्रॉसिटी’ विरोधक व समर्थकांनी आपआपल्या भूमिका ठामपणे मांडल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. विविध मराठा संघटनांनी २३ सप्टेंबरला नगरमध्ये शक्तिप्रदर्शन करत ‘अॅट्रॉसिटी’ कायदा विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याच्याविरोधात आंबेडकरी व समविचारी संघटनांनी नगरमध्ये शक्तिप्रदर्शन करत दि. २३ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय आज, रविवारी झालेल्या बैठकीत घेतला.  हे दोन्ही मोर्चे एकाचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेले जाणार असल्यामुळे जिल्हा व पोलीस प्रशासनाची मोठीच कसोटी लागणार आहे.

कोपर्डीच्या गुन्ह्य़ाचा निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मराठा समाजाच्या विविध संघटना राज्यभर मोर्चे काढत आहेत. या मोर्चात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशीही मागणी होत आहे. विविध पक्षांचे राजकीय नेतेही यासंदर्भात विविध वक्तव्य करत आहे. त्याचे पडसाद उमटत असतानाच आज नगरमध्ये विविध आंबेडकर विचारवादी संघटनांनी बैठक घेत अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना शक्तिप्रदर्शनाने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात झालेल्या बैठकीला अशोक गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, सुनिल शिंदे, प्रा. जयंत गायकवाड, विजय भांबळ, अॅड. भानुदास होले, अशोक कानडे, अशोक सोनवणे, जेव्हिअर भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, महेश भोसले, नितीन कसबेकर, राजेंद्र काळे, सुजय म्हस्के, अर्जुन साळवे, संजय जगताप आदींसह विविध गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात अजय साळवे यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, कोपर्डी प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण राज्यात जातीयवादी हिंसक वातावरण निर्माण करून काही संघटना अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत आहेत, त्याला विरोध करण्यासाठी आंबेडकर विचारांच्या संघटनांचा शक्तिप्रदर्शन करत मोर्चा काढला जाणार आहे. संतोष गायकवाड यांनी स्वागत केले. उपस्थितांनी एकजुटीचा नारा दिला. दि. २३ रोजी शहरातील निलक्रांती चौकातून मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले.