News Flash

यंदाची दिवाळी ‘फुस्स’ होणार?; राज्य सरकारचा फटाके बंदी करण्याचा विचार

फटाकेमुक्त दिवाळीसाठी आरोग्य मंत्री बैठकीत करणार आग्रही मागणी

संग्रहीत

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरोग्य विभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टोपे म्हणाले, “दिवाळी तोंडावर आलेली असताना यावेळी आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल, ही मानसिकता आत्तापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मी याबाबत आग्रह धरणार आहे. फटाक्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात, थंडीमुळे हे वायू वर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकते.”

राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा झाल्यास राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाऊ शकते. याबाबत आज टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा फटाकेबंदी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीत नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन करावे – आरोग्य मंत्री

आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध, दोन दिवसांत नियमावली जाहीर होणार

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध आणले आहेत. जर कोणी अशा ठिकाणी फटाके फोडताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सी फेस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्यास परवानगी असेल. एकाच ठिकाणी जास्त प्रदूषण झालं तर कोरनाच्या संसर्गात वाढ होऊ शकते, लोकांची ऑक्सिजनची पातळी खालावू शकते, त्यामुळे लोकांना स्वतःहून यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले आहे. दोन दिवसांत याबाबत नियमावली येणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 4:28 pm

Web Title: movements to ban firecrackers in the state this year possibility of decision in cabinet meeting aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अर्णब गोस्वामी यांची क्वारंटाइन सेलमध्ये रवानगी
2 अन्वय नाईकांची आत्महत्या न पटणारी; सत्य लवकरच बाहेर पडेल : निलेश राणे
3 मंदिरं उघडण्यासाठीची मार्गदर्शकतत्वे तयार!
Just Now!
X