पुराने हाहाकार माजवलेल्या सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या दोन्ही जिल्ह्यांना आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपये प्रत्येकी अशी मदत जाहीर केली.

आठवले यांनी आज कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या तसेच एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक मदतीची गरज असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी आपल्या खासदार निधीतून दोन्ही जिल्ह्यांना विभागून ५० लाखांची मदत जाहीर केली. तसेच इतर खासदार आणि आमदारांनाही पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहरासह रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी या भागाला तर सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गावाला आठवलेंनी भेटी दिल्या तसेच इथल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलतान त्यांनी अशा प्रकारे पूरप्रलय टाळण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकूल योजनेंतर्गत संबंधित बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.