राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हलगर्जी

सावित्री नदीवरील या ८८ वष्रे जुन्या धोकादायक पुलाला पर्याय म्हणून १५ वर्षांपूर्वी नवा पूल बांधण्यात आला होता. नव्या पुलाच्या उभारणीनंतर जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे अपेक्षित होते, मात्र जुना पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरूच ठेवण्यात आली. यामुळे या दुर्घटनेला महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. हा पूल धोकादायक झाल्याचे स्थानिक नागरिकांनी २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या पुलाच्या दगडांमध्ये पिंपळासह अनेक झाडांनी मूळ धरले होते. त्यामुळे भेगा पडून ते बांधकाम ठिसूळ झाले होते. मात्र प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या दुर्घटनेस प्राधिकरणाची बेपर्वाई कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक दत्तात्रय कळमकर यांनी केला.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे २०११ मध्ये सव्रेक्षण झाले. मुंबईतील कन्सल्टिंग इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस या संस्थेने पुलाची पाहणी केली. त्यात या पुलाला धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मे २०१६ मध्ये या पुलाची तपासणी केली होती. त्यात पुलाला कोणताही धोका संभवत नसल्याचा अहवाल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे ८८ वर्षांच्या या जुन्या जीर्ण पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.  नवीन पुलावरून मुंबईहून गोव्याकडे, तर जुन्या पुलावरून गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. मात्र या दुर्घटनेमुळे हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा कसा देण्यात आला, असा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

महाडपासून ४ किलोमीटर अंतरावर दक्षिणेस बिरवाडी हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवर ब्रिटिशांनी १९२८ मध्ये हा पूल बांधला होता.

हा पूल जीर्ण होऊ लागल्याने या पुलाला पर्याय म्हणून २००१ मध्ये नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. टोलवसुली दीड वर्षांपूर्वी बंद करण्यात आली, मात्र जुना पूल वाहतुकीसाठी सुरूच ठेवण्यात आला.

रायगड जिल्ह्य़ात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचे तांडव सुरू असतानाच मंगळवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान सावित्री नदीवरील पूलच कोसळल्याने दोन एसटीसह किमान तीन वाहने वाहून गेली. या दुर्घटनेत ३० ते ३५ जण बुडाल्याची भीती आहे. मुंबई गोवा महामार्गावरील महाड एमआयडीसीजवळील सावित्री नदीवरील हा पूल ब्रिटीशकालीन होता. महाड-पोलादपूर परिसरात गेले पाच दिवस कोसळत असलेल्या पावसाने सावित्री आणि गांधारी नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहात होत्या. त्यातच हा जुना पूल कोसळला. मात्र मुसळधार पाऊस आणि अमावस्येचा काळोख यामुळे तो कोसळल्याचे लक्षातच न आल्याने एकापाठोपाठ एक पाच ते सहा गाडय़ा दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात वेगाने कोसळल्या.  नदी पात्रात वाहून गेलेल्या दोन एसटी गाडय़ांमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात २ बस चालक आणि २ वाहक यांचाही समावेश होता.

बस क्रमांक एमएच २०-१५३८ ही जयगडहून मुंबईला जात होती तर एमएच ४०-  एन १७३९ ही बस राजापूरहून बोरीवली कडे जात होती. तर अन्य तीन हलकी वाहने पाण्यात पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

महाबळेश्वरचा फटका

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर, पोलादपूर आणि महाड परिसरातील अतिवृष्टीचा सावित्री नदीवरील पुलाला तडाखा बसला. महाबळेश्वर येथे सोमवारी ३९० मिमी तर मंगळवारी ४१० मिमी याप्रमाणे तब्बल ८०० मिमी पाऊस झाला. सावित्री नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होत असल्याने या नदीची पातळी वाढली. पोलादपूर आणि महाड परिसरात दोन दिवसांत जवळपास प्रत्येकी ५०० मिलीमिटर पाऊस पडला. त्याचाही परिणाम नदी पात्रावर झाला व हा पुल वाहून गेला.

सुमारे ३५ जण बेपत्ता

रात्री उशीरापर्यंत उपलब्ध झालेली बेपत्ता व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे – जयगड-मुंबई एसटीचे चालक श्रीकांत शामराव कांबळे (वय ५६, रा.डेरवण फाटा, सावर्डे, ता.चिपळूण),  वाहक विलास काशिनाथ देसाई (४२, रा.फुणगुस, ता.संगमेश्वर) तसेच अविनाश सखाराम मालप (४८, रा.कांबळे लागवण, ता.रत्नागिरी), प्रशांत प्रकाश माने (रा. भंडारपुळे ता. रत्नागिरी), सुनील महादेव बैकर (३५), नेहा सुनील बैकर (३०, दोघेही रा. सत्कोंडी, ता. रत्नागिरी), धोंडू बाबाजी कोकरे (६५, रा. वरवडे, ता. रत्नागिरी), दिपाली कृष्णा बलेकर (२६), अनिष संतोष बलेकर (१२, दोघेही रा. सत्कोंडी, ता. रत्नागिरी), जितेश जैतापकर (३२, रा. जैतापूर, ता. राजापूर), महेंद्र श्रीकांत कांबळे (१८, रा. सावर्डे पोलीस लाइन, चिपळूण), सुरेश देवू सावंत (६०, रा.बावनदी, ता. रत्नागिरी) हे प्रवासी.

राजापूर-बोरीवली एसटीचे चालक गोरखनाथ सीताराम मुंढे (४०, रा.अंतरवेली-बडवली, ता.चिपळूण), वाहक प्रभाकर भानुराव शिर्के (५८, रा. राजवाडी, ता.संगमेश्वर) तसेच आनिश मेमन चौगुले व आवेश अल्ताफ चौगुले (दोघेही रा.लॅण्डसन पार्क, काविळतळी, ता.चिपळूण), बाळकृष्ण बाब्या वरक (२१, रा. नाणार, ता.राजापूर), इस्माईल वाघू (भांबेड, ता. लांजा), अनंत विठ्ठल मोंडे (६५, रा. कुंभवडे, बाणेवाडी ता. राजापूर), जयेश बाणे (३६, रा. सोलगाव, ता. राजापूर), अजय सीताराम गुरव (४०, रा.ओणी, ता. राजापूर), विजय विक्रम पंडित (४०, रा. सोनगिरी, ता. संगमेश्वर), विनीता विजय पंडित (३५, रा. सोनगिरी, ता.संगमेश्वर), गणेश कृष्णा चव्हाण (४२) व पांडुरंग बाबू घाग (५५, दोघेही रा. दोणवली, ता. चिपळूण), रमेश गंगाराम कदम (३०, रा. नांदीवसे, ता. चिपळूण), गोविंद सखाराम जाधव (६५, रा. दळवटणे, ता. चिपळूण), भिकाजी वाघधरे (७९, रा. जैतापूर, ता. राजापूर) हे प्रवासी. या व्यतिरिक्त आणखी दोन ज्येष्ठ नागरिक राजापूर-बोरीवली एसटीमध्ये राजापूर येथे बसल्याची माहिती आहे.

स्वप्न भंगली..

या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या युवकांपैकी चिपळूणचे आनिश आणि आवेश चौगुले हे चुलत भाऊ असून दोघेही दुबईत नोकरीला जाण्यासाठी पूर्वतयारी करीत होते. आनिशला पारपत्रही मिळाले होते तर आवेशची पारपत्रासाठी बुधवारी मुलुंडच्या कार्यालयात मुलाखत होती. त्यासाठी हे दोन्ही भाऊ राजापूर-बोरीवली एसटीमध्ये चिपळूणला चढले. या गाडीतून जात असल्याचा दूरध्वनी त्यांनी कुटुंबियांना केला. त्यानंतर त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

दु:खाचा घाला..

गणेश चव्हाण आणि पांडुरंग घाग हे दोघे मावशीच्या कार्यासाठी मुंबईला चालले होते, तर रमेश कदम आजीच्या कार्यासाठी गावी आले होते. त्यांचे फक्त एक वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. सोनगिरीचे पंडित पती-पत्नी कामानिमित्त मुंबईत राहतात. ते आपल्या आजारी बंधूंना भेटण्यसाठी सोनगिरी या मूळ गावी आले होते.

संपूर्ण कुटुंब हरवले

गुहागरच्या तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार या तालुक्यातील असलेले आणि मुंबईत राहाणारे मिरगल कुटुंबीय खासगी गाडीने (एमएच ०४ – ७८३७) याच काळात मुंबईला गेले असून त्यांचा अजून तपास लागलेला नाही. त्यामुळे तेही या अपघातात सापडले असण्याची भीती आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे – जयवंत सखाराम मिरगल (वय ४०), बाबा सखाराम मिरगल (वय ३६), जयवंती सखाराम मिरगल (वय ७०, तिघेही रा.वाकोला, सांताक्रुझ, दत्त मंदिर, मुंबई), दत्ताराम भागोजी मिरगल (वय ६१, रा.छप्परपाडा, सानपाडा, नवी मुंबई), संपदा संतोष वाजे (वय ३७), संतोष सिताराम वाजे (वय ४०, दोघेही रा.अमृतनगर, गणपती मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई), आदीनाथ कांबळे (वय ४५, रा.जोगेश्वरी, मुंबई) व दिनेश सखाराम कांबळे (वय ४०, रा.बोरीवली, मुंबई) या गाडीच्या चालकाचे नाव समजलेले नाही.

चालक कांबळे यांचा मुलगा महेंद्रला मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याबाबतची तांत्रिक पूर्तता करण्यासाठी तो वडीलांसमवेत चालला असताना दोघेही या दुर्घटनेत सापडले.

जीपीएसमुळे सुगावा!

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एसटीच्या वाहकाला तिकीट मशीन दिले जाते. या मशीनमध्ये एक स्मार्टकार्ड(जीपीएस) बसवण्यात आले आहे. यात वाहकाने प्रवाशांना किती तिकीट दिले याची माहिती नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध होते. मात्र साडेअकरा नंतर जयगड-मुंबई(एमएच २०-बीन १५३८) आणि राजापूर-बोरिवली(एमएच ०४ एन ९७३९) या गाडीतील तिकीटांची माहिती येणे अचानक बंद झाले. तसेच डेपोत पोहोचण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही दोनही गाडय़ा आल्या नाहीत. यावर चौकशी सुरू झाली. यानंतर जीपीएस यंत्रणा हा पुलावरच बंद झाल्याचे निदर्शनास आले. आणि गाडय़ा नदीत कोसळल्याचे समजले.

घटनेच्या पंधरा मिनिंटा पूर्वी म्हणजेच रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास गुहागर-भांडुप(एमएच ४०-९८२९)  ही गाडी अरविन रेडीज या चालकाने पुढे नेल्याचे जीपीएसद्वारे कळले होते.

‘सखोल चौकशी

अलिबाग :  महाड पूल दुर्घटना अतिशय दुर्दैव असून बेपत्ता नागरिक व वाहनांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाड येथे दिली.

१०० वर्षांवरील पुलांची तपासणी

महाड येथील दुर्घटनेनंतर राज्यातील शंभर वर्षांवरील सर्व पुलांची तपासणी करण्यात यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभेत दिले.  बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शंभर वर्षांवरील सर्व पुलांची तपासणी आयाआयटीच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले.

‘खुनाचा गुन्हा दाखल करा’

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी विधानसभेत केली.

हा पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याचे मे महिन्यात अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आढळून आल्यामुळेच या पुलावरील वाहतुकीस परवानगी दिली अशी माहिती या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे संतप्त झालेल्या अजित पवार यांनी मे महिन्यात पूल वाहतुकीस सुस्थितीत होता तर एवढी मोठी दुर्घटना घडली कशी, असा सवाल  केला.