किरण वडेट्टीवारांच्या नावामुळे समीकरणे बदलली

गडचिरोली व देसाईगंज येथे १८ डिसेंबरमधील पालिका निवडणुका बघता भाजप, कांॅग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे प्रमुख चारही पक्ष कामाला लागले आहेत. गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेस विधी मंडळ उपनेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांचे नाव समोर आल्याने राजकीय समीकरणे झपाटय़ाने बदलली आहेत.

या आदिवासी जिल्ह्य़ात कधी काळी कॉंग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, आता तो पूर्णपणे भाजपमय झालेला आहे. येथे भाजपचे अशोक नेते यांच्या रूपाने एक खासदार व अंबरीश आत्राम, कृष्णा गजबे व डॉ. देवराव होळी, असे तीन आमदार आहेत. पालकमंत्री अंबरीश आत्राम व खासदार नेते यांची या जिल्ह्य़ात भाजपवर पकड असल्याने हे दोन्ही नेते म्हणतील त्याच महिलेला गडचिरोली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. सध्या तरी भाजपकडून यासाठी प्रमुख तीन नावांवर चर्चा सुरू आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या पत्नी योगिता पिपरे यांचे नाव अग्रक्रमावर आहे. त्या या पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यां नसल्या तरी पिपरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वष्रे नगरसेवकही होते. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्यानेच पिपरे यांनाच उमेदवारी द्यावी, असा सूर आहे. विद्यमान सभापती बेबी चिचघरे व गीता सुशील हिंगे पोरेड्डीवार यांच्याही नावांची चर्चा आहे, तर कॉंग्रेसमध्ये विधीमंडळ उपनेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मजबूत पकड आहे. कॉंग्रेसने नुकत्याच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात माजी नगरसेविका नयना अरुण पेंदोरकर, मंगला कन्नमवार, नगरसेविका लता मुरकुटे, युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव लता पेंदापत्ती व प्रभा नरेंद्र भरडकर या पाच महिलांची नावे आघाडीवर होती, परंतु वडेट्टीवार यांनी ऐनवेळी गुगली टाकू न पत्नी किरण वडेट्टीवार हिचे नाव थेट नगराध्यक्षपदासाठी समोर केल्यामुळे या पक्षातील इच्छुकांना धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे किरण वडेट्टीवार यांचे नाव अतिशय पध्दतशीरपणे समोर करण्यात आले असल्याने पक्ष निरीक्षक किंवा वडेट्टीवार विरोधक किरण यांच्या नावाला विरोध करू शकत नाही. त्यांचे नाव अचानक समोर आले असले तरी त्यांचे निवडणूक लढणे अद्यापही निश्चित मानले जात नाही आहे. कारण, वडेट्टीवार यांच्या ज्येष्ठ मुलीचा विवाह २० डिसेंबरला नागपुरात आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी असलेली ही निवडणूक त्या कशा लढवतील, असाही प्रश्न वडेट्टीवार विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

तिकडे देसाईगंज येथे कॉंग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी अर्चना भास्कर डांगे, कल्पना कृष्णा भांडारकर, विद्या जेसामल मोटवानी, निलोफर रकिब शेख व नीता संजय गुरू यांच्या नावांची चर्चा आहे. कांॅग्रेसने अद्याप कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. राष्ट्रवादीने गडचिरोलीसाठी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या पत्नी प्राचार्य कविता पोरेड्डीवार हे एकमेव नाव समोर केले आहे.

विदर्भात २७ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबरला होणाऱ्या पालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. नगरसेवकपदासह नेहमीप्रमाणेच, पण  नगराध्यपदासाठी यंदा थेट निवडणूक होत असल्याने काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांलाच उमेदवारी देण्याची भाषा केली जात असली तरी नेत्यांची पावले मात्र घराणेशाहीकडेच वळताना दिसत आहेत. त्यामुळे ऐनवेळी गटबाजी उफाळून येण्याची किंवा बंडखोरीचे निशाण फडकवले जाण्याची शक्यता आहे. काही पालिकांमध्ये प्रमुख पक्षांमध्ये सरळ, कुठे तिरंगी, चौरंगी आणि कुठे बहुरंती लढतीचेही चित्र सध्या आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अद्याप कुठलेही चित्र अस्पष्ट झालेले नसले तरी राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षबदलाच्याही शक्यता वर्तविल्या जात आहेत.