शेतात ठिबक सिंचनासाठी हात उसने घेतलेली दीड लाखांची रक्कम परत देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आपल्या भावकीतील शंकर धोंडिबा घोडके (४८) याचा तीक्ष्ण हत्याराने मारून खून केल्याप्रकरणी तिघा जणांविरु द्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील कुमठा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
शंकर घोडके यांचा गावातील महालक्ष्मी मंदिराच्या पायरीवरच खून करण्यात आला. त्या वेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. या घटनेमुळे कुमठा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी बब्रुवान घोडके याच्यासह त्याची मुले सुधीर व सुजित घोडके यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार मृत शंकर याने आपल्या भावकीतील बब्रुवान घोडके याच्याकडून आपल्या शेतात ठिबक सिंचन करण्यासाठी दीड लाखांची रक्कम हात उसने घेतली होती. ही रक्कम परत मिळावी म्हणून बब्रुवाने याने तगादा लावला, तरी शंकर हा टाळाटाळ करीत होता. त्यातून उभयतांमध्ये वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळी शंकर व बब्रुवान व त्याची मुले सुधीर आणि सुजित यांची भेट महालक्ष्मी मंदिरासमोर झाली. त्या वेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यातूनच शंकर याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.