News Flash

राज्यात मुस्लीम लीग २२ जागा लढणार

नांदेडमधून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात आपण स्वत: उभे राहू, असेही ते म्हणाले.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुस्लीम मतदार सध्या विविध पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. त्यांना सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीत अकोल्यासह राज्यातील २२ जागा मुस्लीम लीग पक्ष लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.

जातीयवादी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी काँग्रेस विरोधी पक्षांची एकत्र आघाडी करू पाहात आहे. केरळमध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग सोबत असले तरी लोकसभा निवडणुकीत आम्हाला सोबत घेण्यास ते इच्छुक नाहीत. काँग्रेसची ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप अफसर अली यांनी केला. ओवेसींमुळे मोठे नुकसान झाल्याने वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मुस्लीम लीग लोकसभा व विधानसभा निवडणूक लढणार आहे. लोकसभेच्या किमान २२ जागा लढणार असून, एक-दोन दिवसांत उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे अफसर अली यांनी सांगितले. नांदेडमधून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात आपण स्वत: उभे राहू, असेही ते म्हणाले.

मुस्लीम लीगची अकोल्यात चांगली स्थिती होती. मधल्या काळात थोडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा संघटन मजबूत करून ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे अफसर अली यांनी सांगितले. मुस्लीम लीगमध्ये सर्व धर्मनिरपेक्षांना एकत्र आणण्याची क्षमता असल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्रान अशरफी यांनी यावेळी केला. अकोल्यातील अ‍ॅड. नजीब शेख यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2019 1:02 pm

Web Title: muslim league to fight 22 seats in maharashtra lok sabha election 2019
Next Stories
1 …मी म्हातारा झालोय का ?: शरद पवार
2 सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना चिमटा
3 दलित समाजाला ग्राह्य धरु नका, आठवलेंचा भाजपा- शिवसेनेला इशारा
Just Now!
X