दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील माय-लेक सुखरुप 

वणी : सध्या सर्वत्र करोना संसर्गामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. आप्तस्वकीय, मित्र यांना थेट भेटून मदत करण्याची इच्छा असूनही तसे करता येत नसताना माणुसकी आणि मैत्रीची भावना यावरही मात करून करोना संकटात मित्रांच्या मदतीला धावून जात असल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे. अशीच एक घटना दिंडोरी तालुक्यातील मोहाडी  येथील मित्राच्या बाबतीत घडली.

मोहाडी येथील चंद्रकांत अहिरे यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना करोनाची लागण झाली. अहिरे हे विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून देवळाली  येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. विनाअनुदानित असल्याने  पुरेसा पगार नाही. घरची परिस्थितीही बेताचीच. या परिस्थितीत ते नाशिक येथील एका करोना के ंद्रात दाखल झाले. तेथे त्यांनी चार दिवस उपचार घेतले. परंतु, तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना  अत्यवस्थ वाटू लागल्याने तिथून हलविणे गरजेचे होते.

१९९५ मध्ये त्यांच्याबरोबर इयत्ता १० वीच्या वर्गात असणाऱ्या मित्रांच्या ‘के.आर.टी.मोहाडी‘ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला हे कळले. अशा कठीण समयी वर्गमित्रास मदत करण्यासाठी सर्वजण सरसावले. त्यांनी सर्वांनी अहिरे यांना त्यांचा स्वाभिमान न दुखविता मदत  करण्याचे ठरविले. बघता बघता एकाच दिवसात लाखाच्या वर रक्कम जमा झाली. त्यात शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार वर्गमित्रांबरोबरच  सासरी गेलेल्या वर्ग मैत्रिणींनीही आपला मोठा सहभाग नोंदवला. नंतर मित्रांनी त्यांना इतर रुग्णालयात हलविण्याचे ठरविले. परंतु, प्राणवायूयुक्त शय्या मिळण्यास अडचण येऊ लागली.

अशावेळी वर्गमित्रांनी अहिरे यांची आरोग्यविषयक परिस्थिती जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांच्या कानी घातली. प्राणवायूयुक्त खाट उपलब्धतेची कठीण  परिस्थिती असतानाही अमृता पवार यांनी तशी व्यवस्था के ली. त्यानंतर काही वर्गमित्र करोना केंद्रातून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यासाठी केंद्रात गेले. परंतु, त्याआधीच अहिरे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चंद्रकांत अहिरे यांना आईसह डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सहा दिवस वर्गमित्रांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधे, जेवणाच्या डब्यासह आर्थिक स्वरूपात मदत के ली. अशा प्रकारे अहिरे यांच्यासह त्यांच्या कु टुंबाला अडचणीच्या काळात सर्व प्रकारची मदत वर्गमित्रांनी केली. यासाठी त्यांचे इयत्ता १० वीतील वर्गमित्र डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण अधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, वैभव पाटील ,शंकर ठाकूर, शरद झोमण, सुनील मौले, दिगंबर शेळके, सतीश देशमुख  यांनी आर्थिक मदतीबरोबरच आपला जीव धोक्यात घालून कुटुंबातील सदस्यासारखे पूर्ण कालावधीत प्रत्यक्ष मदत केली. आता चंद्रकांत अहिरे आणि त्यांच्या मातोश्री  पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विद्यार्थ्यांंनी २५ वर्षांपूर्वीची आठवण ठेवून आपल्या अडचणीत आलेल्या मित्राला मदत के ल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.