|| रवींद्र जुनारकर

पाच संचालकांची तक्रार, प्रक्रियेवरच ‘नाबार्ड’चा आक्षेप :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डचे सर्व नियम धाब्यावर बसवून तथा सेवाज्येष्ठता यादी डावलून १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, बँकिंग अधिकारी ग्रेड १ व ग्रेड २ या पदावर पदोन्नती दिली आहे. दरम्यान, या पदोन्नती प्रक्रियेवरच ‘नाबार्ड’ने आक्षेप नोंदवला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने २०१७ ते २०१९ या मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या एकूण १५० कर्मचाऱ्यांना विविध पदांवर बढती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे एससी, एसटी, एनटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात आली असल्यामुळे त्यांची पदोन्नती करण्यात आली नाही. केवळ खुल्या व ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती देण्यात आलेली आहे. १५० कर्मचाऱ्यांना विविध पदांवर पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादी डावलण्यात आली आहे. पदोन्नतीमध्ये झालेला अन्याय दूर करण्याबाबत बँकेचे अन्यायग्रस्त कर्मचारी तसेच बँकेचे संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, संतोष रावत, विजय बावणे, नंदा अल्लूरवार तथा बनसोड यांनी अध्यक्ष मनोहर पाऊणकर तथा बँकेचे व्यवस्थापक यांना लेखी पत्र दिले. मात्र या पाच ते सहा संचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. दरम्यान, या संचालकांनी थेट ‘नाबार्ड’चे सहायक व्यवस्थापक तथा तपासणी अधिकारी वाकचौरे यांच्याकडे तक्रार केली. याची गंभीर दखल घेत ‘नाबार्ड’ने आता या पदोन्नती प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. बँकेच्या १५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली तेव्हा सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करणे, आक्षेप मागवणे, त्यानंतर अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करणे अभिप्रेत होते. मात्र बँकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही ‘नाबार्ड’ने म्हटले आहे. काही अधिकारी व कर्मचारी यांनी लेखी पत्र देऊन सेवाज्येष्ठता यादीची मागणी केली असता त्यांना यादी पुरवली गेली नाही.

‘नाबार्ड’तर्फे मागील वर्षांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यामध्ये पदोन्नतीबाबत आक्षेप घेण्यात आला असता बँकेतर्फे पुर्तता अहवाल योग्य पध्दतीने  सादर केला गेला. पूर्णपणे चुकीचा अहवाल सादर केला गेला. १५० कर्मचाऱ्यांपैकी सहायक व्यवस्थापक पदावर पदोन्नती देण्यात आलेले कोलते, चहारे तसेच बँकिंग अधिकारी  ग्रेड १ पदावर पदोन्नती देण्यात आलेले धोतरे व तोटावर हे चारही अधिकारी बँकेच्या कर्मचारी सोसायटीचे पदाधिकारी आहेत. त्यामुळेच त्यांना नियमबाहय़ पदोन्नती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवरच ‘नाबार्ड’ने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाबार्डने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे व नियमबाहय़ चुकीचा अहवाल सादर केल्याची बाब समोर येताच बँकेचे संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, संतोष रावत, नंदा अल्लूरवार व विजय बावणे यांनी पुन्हा एकदा ‘नाबार्ड’ला लेखी तक्रार नोंदवली आहे. तसेच सहकार मंत्रालयाकडे देखील हे १५० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे  प्रकरण गेल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.