प्राचार्यानाही आरोपी करण्याची मागणी

नागपूर : दोन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यामुळे जी.एस. महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. राहुल राधारमण तिवारी (१६) रा. किराट लेआऊट, मानकापूर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मात्र, प्राचार्यानी विद्यार्थ्यांच्या मारहाणीत राहुलचा मृत्यू झाल्याची बाब लपवून ठेवून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न  केला, असा आरोप करीत राहुलच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्राचार्यानाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मृताचे वडील व नातेवाईकांनी केली. महाविद्यालय व पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून निदर्शने करण्यात आल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

राधारमण तिवारी हे एका वृत्तपत्राच्या कार्यालयात वितरण विभागात नोकरी करतात. त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा राहुल हा जी.एस. महाविद्यालयात बारावी बी.कॉम.चे शिक्षण घेत होता. काल, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता तो स्टार बसने मानकापूरवरून महाविद्यालयात पोहोचला.

दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक राधारमण यांना भ्रमणध्वनीवर त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडली असून दंदे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली. ते रुग्णालयात पोहोचले असता मुलगा आयसीयूमध्ये होता. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर प्रकरण सीताबर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी प्राचार्य एम.एन. खंडाईत यांची चौकशी केली असता त्यांनी राहुल हा वर्गात जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मात्र, राहुलच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना दिलेली माहिती वेगळीच होती. दोन मुलांनी राहुलला वर्गात मारहाण केल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ते कलम वाढवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

जमावापासून वाचवण्यासाठी प्राचार्य ताब्यात

शवविच्छेदनानंतर राहुलचे वडील, नातेवाईक व काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मृतदेह घेऊन महाविद्यालयात पोहोचले. प्राचार्यानी पालक व पोलिसांना खोटी माहिती दिली. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व प्राचार्याना सहआरोपी करावे, अशी मागणी ते करू लागले. त्यामुळे परिमंडळ-२ चे उपायुक्त चिन्मय पंडित, सीताबर्डी, अंबाझरी, धंतोली, सदर आणि मानकापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत केले व प्राचार्याना जमावापासून वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर जमावही सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचला. या ठिकाणी राहुलच्या वडिलांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन गेले. यासंदर्भात महाविद्यालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

कागदी बाण उडवण्यावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास वर्गात शिक्षक नसताना विद्यार्थी एकमेकांसोबत बोलत उभे होते. त्यावेळी राहुलने कागदी रॉकेट उडवला. त्याला विरोध करीत दोन मुले पाठीमागून आले व त्यांनी राहुलच्या डोक्यावर मारले. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याचे डोके जमिनीवर आदळले व बेशुद्ध झाला. त्याला शिक्षकांनी दंदे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.