03 March 2021

News Flash

वेळ द्या, मी चर्चेला तयार; मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला पटोलेंचे उत्तर

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती कामे केली, किती खर्च झाला, याची श्वेतपत्रिका काढावी."

“आम्ही राज्याचा विकास केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे”, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले होते. यावर “मुख्यमंत्र्यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारले आहे. वेळ द्या, चर्चेसाठी कुठेही येतो”, असे प्रतिउत्तर काँग्रेसचे राज्य प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.

भाजपाच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पर्दाफाश यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान यवतमाळमध्ये बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. “आघाडीचे सरकार असताना भाजपाकडून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली जात होती. मात्र युतीच्या पाच वर्षात राज्यावरील कर्ज वाढले आहे. त्यामुळे पारदर्शक कारभार करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती कामे केली, किती खर्च झाला, याची श्वेतपत्रिका काढावी”, अशी मागणी पटोले यांनी केली.

“सरकार दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावरही गुन्हे दाखल करत आहे. विकास केल्याचे वातावरण तयार केले जात आहे. शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहेत. पंतप्रधान मोदीही गरिबाचे प्रश्न सोडवू असे सांगत आहेत. पण या देशात अदानी आणि अंबानी हेच दोन गरीब आहेत”, अशी टीका त्यांनी केली. “आम्ही भाजपा सरकारच्या पोकळ घोषणांचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे आव्हान मी स्वीकारले आहे. कुठेही चर्चेसाठी तयार आहे. त्यांनी वेळ द्यावा”, असे उलट आव्हान पटोले यांनी दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:01 pm

Web Title: nana patole accepted chief minister fadnavis challenge bmh 90
Next Stories
1 कोल्हापूर : काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या तीन पिढ्यांचा पक्षाला रामराम
2 मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद
3 महाजनादेश यात्रेच्या समारोपाला येणार नरेंद्र मोदी
Just Now!
X