राज्यासह देशाचे लक्ष वेधलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात सुमारे ६५ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह २३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
सकाळी सातपासूनच अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. ९१वर्षीय माजी खासदार गो. रा. म्हैसेकर यांनी सकाळी नातीसमवेत मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सर्वात वयोवृद्ध १०५ वर्षीय जैलबी यांनी होळी भागातील प्रतिभा निकेतन हायस्कूलमधील केंद्रात मतदान केले. विवाहबंधनात अडकतानाच चार्टर्ड अकौन्टन्ट दिनेश दाड यांनी लेबर कॉलनी परिसरात मतदानाचा हक्क बजावला. दाड यांचा सकाळीच माहेश्वरी भवनात विवाह पार पडला.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजुरकर यांनी सकाळी शिवाजीनगर परिसरात सहकुटुंब मतदान केले. चव्हाण यांच्या दोन मुलींनी प्रथमच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील, महापौर अब्दुल सत्तार, भाजपचे चतन्य देशमुख यांनी आपापल्या भागात सकाळीच मतदान केले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी मतदानाचा हक्क बजावत असताना भाजपचे उमेदवार डी. बी.पाटील यांचे नाव मतदारसंघात नसल्याने त्यांनी मतदान केले की नाही, हे समजू शकले नाही.
गतवर्षी जिल्ह्यात ५३.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वच केंद्रांवर चोख बंदोबस्त होता. मतदान केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे नियोजन दखलपात्र होते. अनेक गावांत भाजपचा तंबूच उभारला गेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. कोणत्याही पक्षाच्या वाहनाचा वापर करण्याचे मतदारांनी कटाक्षाने टाळले. उन्हाचा प्रहर सुरू होण्यापूर्वीच सकाळी मतदानाला अनेकांनी प्राधान्य दिले. नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत चालला आहे. गुरुवारी शहर व जिल्ह्यात ४० अंशांपेक्षा अधिक तापमान होते.