नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे पुरात तवेरा कार वाहून गेली असून यात एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला. पुलाच्या दुतर्फा थांबलेल्या लोकांनी चालकाला कार पुढे नेऊ नका, नाल्यातील पाणी पुलावरुन वाहत असून पाण्याला जोरदार प्रवाह आहे, असा धोक्याचा इशाराही दिला होता. मात्र, यानंतरही चालकाने कार पुलावर नेली आणि अखेरीस तिघांचा मृत्यू झाला.

नायगाव तालुक्यातील बरबडा गावात राहणारे बाबुशा उर्फ गंगाधर मारुती दिवटे (वय ४०) हे त्यांची पत्नी पारूबाई दिवटे (वय ३५), अनुसया दिवटे (वय ६) यांच्यासह मांजरम येथे बहिणीकडे जेवायला गेले होते. त्यांची बहीण यात्रेवरुन परतली होती आणि त्यानिमित्त दिवटे कुटुंबिय जेवायला तिच्या घरी गेले.

सोमवारी रात्री दिवटे कुटुंबिय तिथून घरी जाण्यासाठी निघाले. कहाळा मार्गी बरबड्याला जाताना एक नाला लागतो. पावसामुळे या भागात पूरस्थिती असून नाल्यातील पाणी पुलावरुन वाहत होते. पाण्याचा प्रवाह जोरात होता. पुलाच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या लोकांनी दिवटे यांना कार पुढे नेऊ नका, अशी सूचना केली. पुलावरुन पाणी वाहत असून अशा प्रवाहात गाडी पुढे जाणे कठीण आहे, असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. मात्र, याकडे दुर्लक्ष करत दिवटे यांनी कार पुढे नेली. अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत कार वाहून गेली. पाण्यात बुडून कारमधील तिघांचाही मृत्यू झाला असून या घटनेमुळे बरबडा येथे शोककळा पसरली आहे.

दुसऱ्या एका घटनेत मांजरम येथे विनायाक बालाजी गायकवाड (वय ३०) हा तरूणही पुराच्या पाण्यात वाहून गेला. रुग्णालयात दाखल असलेल्या बहिणीला डबा देऊन तो परतत होता. पुलाच्या कडेला बाईक थांबवून विनायक पाण्याचा अंदाज घेण्यासाठी चालत पुढे गेला. यादरम्यान तो वाहून गेला. त्याचा मृतदेह बेंद्री गावात सापडला.