राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये केली. राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारविरोधात काँग्रेसने मंगळवारी नागपूरमध्ये विधान भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी केलेल्या भाषणात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
ते म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता राज्यातील ३००० लोकांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर ३००० खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पाससाठी पैसे नाहीत. म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांवरही आत्महत्येची वेळ आली आहे. तरीही सरकार त्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. नागपुरात अनेक गुन्हे घडले आहेत. तरीही गृह विभागाचा कारभार पाहणारे मुख्यमंत्री शांत आहेत. काही महिन्यांपूर्वी लाट होती म्हणून तुमचे इतके लोक निवडून आले पण आता लोट ओसरली आहे. आता आमच्याकडे जनसागराची लाट आहे, असेही त्यांनी सांगितले.