महाराष्ट्रीय खाद्य आणि परंपरा, संस्कृतीची जपवणूक करणारी वृत्ती ही वैशिष्टय़े विदेशी नागरिकांनाही भुरळ पाडतात. आता याच महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन अमेरिकनवासीयांना घडविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोहिमेत येथील ‘हॉटेल संस्कृती’ची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम स्क्वेअर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत ‘दिवाळी महोत्सव २०१४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख अमेरिकावासीयांना व्हावी या दृष्टीने आयोजित या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून फक्त हॉटेल संस्कृतीची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक व दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन या कार्यक्रमात संस्कृतीतर्फे मांडण्यात येणार आहे. त्यात बैलगाडीचे चाक, दळण्याचे जातं, कंदील, चूल, शिरई, ताट, वाटी, तांब्या, पोळपाट आदी वस्तू ठेवण्यात येणार आहेत.
अमेरिकेत भरणाऱ्या या प्रदर्शनास लाखो लोक भेट देतात. या प्रदर्शनास संस्कृतीचे संचालक दिग्विजय शिवाजी मानकर उपस्थित राहणार आहेत. एक तपापेक्षा अधिक काळापासून निष्ठेने खाद्यापासून सर्व प्रकारच्या महाराष्ट्रीय संस्कृतीची जपवणूक करण्याचेच ही निवड म्हणजे फळ असल्याची प्रतिक्रिया मानकर यांनी व्यक्त केली आहे.