दिल्लीच्या व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे प्रकरण घोटी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि इतर तीन पोलिसांना भोवले आहे. या चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एस.एम.बी.टी.आरोग्य महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी जाणाऱ्या दिल्ली येथील व्यापाऱ्याला देवळेगाव येथे अडवून त्याच्याकडील १० लाख रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत विभागीय चौकशी करून चारही जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

दिल्ली येथील व्यापारी सुमनकुमार प्रामाणिक हे १४ नोव्हेंबरला नाशिक येथून वाहनाने घोटीमार्गे धामणगाव शिवारातील एसएमबीटी आरोग्य महाविद्यालयात जात होते. आपल्या पाल्याच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारी १६ लाखांची रक्कम त्यांच्याजवळ होती. या मार्गावरून नोटांची वाहतूक होत असल्याची माहिती वाहनचालक प्रशांत पाळदे याने घोटी पोलीस ठाण्यातील कर्मचारी राम ज्ञानेश्वर निसाळ यांना दिली. त्याची खातरजमा करण्यासाठी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके,पोलीस हवालदार वसंत पगारे, पोलीस शिपाई प्रशांत गवळी आणि राम निसाळ हे खासगी वाहनाने तात्काळ निघाले. त्यांनी देवळे पूलाजवळ व्यापारी प्रामाणिक यांचे वाहन अडवले होते. त्यांनी व्यापाऱ्याला खैरगाव रस्त्यावर निर्जनस्थळी नेले. त्यांच्याजवळील १६ लाखांपैकी दहा लाख रुपये बळजबरीने काढून घेतले होते.
याबाबत व्यापारी प्रामाणिक यांनी नाशिक येथील रहिवासी ढिकले यांची मदत घेऊन २० नोव्हेंबरला घोटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांनी दोन ते तीन दिवसांत मध्यस्थीमार्फत व्यापारी प्रामाणिक यांचे १० लाख रुपये परत केले. या गंभीर प्रकारची जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश त्यांनी दिले होते. यात हे चारही कर्मचारी दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.