करोनाच्या भीतीनं नागरिक भीतीच्या छायेत वावरत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयाकडून उपचार शुल्काच्या नावाखाली वसुली सुरू असल्याचा एक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला होता. या प्रकरणात महापालिकेनं संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावल्यानंतर आता आणखी एका खासगी रुग्णालयात असाच प्रकार सुरू असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. कळस म्हणजे रुग्णालयानं दहा दिवस उपचार केले असताना पंधरा दिवसांच्या उपचाराचे पैसे वसूल केले.

करोना रुग्णाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा दर आकारणी केल्याबाबतच्या आलेल्या तक्रारीवरून शहरातील पायोनियर हॉस्पिटलला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली आहे.

शासनाने करोना रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी दर आकारणी बाबत दर निश्चित करून दिलेले आहेत. याबाबत वारंवार आवाहन करून देखील काही रुग्णालय याबाबत दक्षता घेत नसल्याचे प्राप्त तक्रारीवरून लक्षात आले आहे. या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संबंधित हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याबाबतची बिलांची तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने मनपाचे मा.मुख्य लेखा परिक्षक यांच्याकडे रुग्णाने फोनवरून अशोका मार्ग येथील पायोनियर हॉस्पिटलमध्ये जादा बिलाची आकारणी केल्याबाबतची तक्रार केली होती. त्यात या हॉस्पिटलने या रुग्णाकडून एका पीपीई किटच्या किंमतपोटी एका दिवसासाठी र.रु १०,५००/-इतकी आकारलेली आहे. रुग्णावर दहा दिवसच उपचार सुरू असताना कन्सल्टींग शुल्क पंधरा दिवसाचे लावले आहेत.

याबाबत रुग्णाचे बिल व अनुषंगिक कागदपत्रे कार्यालयात सादर करणेबाबत वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता, त्यांनी अद्याप याबाबतची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची व कायदा भंग करणारी असल्याने पायोनियर हॉस्पिटल, नाशिक यांना मुख्य लेखापरीक्षक बी.जे.सोनकांबळे यांनी मनपाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती सोनकांबळे यांनी दिली.

यापूर्वी दोन रुग्णालयांना नोटीस

नाशिकमध्ये असा प्रकार यापूर्वीही उघडकीस आला आहे. याप्रकरणाची दखल महापालिकेनं घेतली होती. नाशिकमधील इंदिरानगरे येथील अशोका मेडिकव्हर व भाभानगरमधील सह्याद्री या दोन रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेनं खासगी रुग्णालयातील देयकांची छाननी करण्याच काम मनपानं हाती घेतलं आहे.