|| चिन्मय पाटणकर

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्तीधारक शंभरच्या आत

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (एनटीएस) महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीधारकांच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेत गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीधारकांचे प्रमाण शंभरच्या आत आले असून, राज्यातील प्रज्ञावंत घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाते. पहिल्या स्तरात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून राज्य पातळीवर पहिली परीक्षा होते. त्यातील गुणवंत विद्यार्थी एनसीईआरटीने ठरवलेल्या कोटय़ाच्या प्रमाणात राष्ट्रीय परीक्षेसाठी निवडले जातात. २००६-०८मध्ये दहावीऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सहा वर्षांनी पुन्हा निर्णय बदलून दहावीच्याच विद्यार्थ्यांसाठी ती ठेवण्यात आली. मात्र, २०१२-१३ पासून शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. १९९२-९३ ते २०१६-१७ एवढय़ा वर्षांपैकी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या २००५-०६मध्ये सर्वाधिक २९२ पर्यंत पोहोचली होती.

गेली पाचही वर्षे राज्यातील ६० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवरील परीक्षा दिली. मात्र, शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेली दोन वर्षे शंभरच्या आतच आहे. २०१७-१८मध्ये ६९ हजार २० विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावरील परीक्षा दिली. त्यात महाराष्ट्रासाठी ३८७ कोटा देण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर ३८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल सप्टेंबरअखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्य पातळीवरील परीक्षा राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमानुसार होते. तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार होते. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये तफावत आहे. राज्याच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत सीबीएसईची काठिण्यपातळी अधिक आहे. राष्ट्रीय पातळीवर एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात राज्याचा वाटा जवळपास दहा टक्के किंवा त्याहून अधिक राहिला आहे,’ असे परीक्षा परिषदेचे उपायुक्त सुरेश माळी यांनी सांगितले.

कोटय़ातही घट

गेल्या पाच वर्षांमध्ये एनसीईआरटीकडून दिल्या जाणाऱ्या कोटय़ामध्येही घट होत आहे. १९९९-२००० ते २०११-१२ दरम्यान ५०० ते ४९५ असा कोटा देण्यात आला होता. २०१२-१३ पासून ४११ ते ३८७ पर्यंत तो कमी झाला आहे.

प्रवेश अर्ज उपलब्ध

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पीएचडीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे ही शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाची आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेची माहिती  http://www.mscepune.in आणि  http://nts.mscescholershipexam.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. २०१९ची राज्यस्तरावरील परीक्षा ४ नोव्हेंबर आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा १२ मे रोजी होणार आहे.