नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हत्याकांड घडवले. जिल्ह्यातील पुरसलगोंदी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्याचबरोबर कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्य व शेडचे नक्षल्यांनी नुकसान केले.

मासु पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे आहेत. मृतांची नावं आहेत. मासु पुंगाटी हे पोलीस पाटील आहेत, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांकडून कायम विरोध होत राहिला आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून येथे उत्खननाचे काम सुरू आहे. या उत्खननाला पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील मासू पुंगाटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषी मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याची करण्यात आल्याची बाब प्राथमिक माहितीतून समोर आली आहे.

शहीद सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध ठिकाणी पत्रके व बॅनर बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर व पत्रकांची होळी करून नक्षलवादी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर २९ नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या हत्येनंतर ३० नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले होते. मात्र आज सप्ताहाचा दिवस उजाडताच नक्षलवाद्यांनी पूरसलगोंदी येथील दोघांची हत्या तसेच कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील विविध साहित्य व शेडची  मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तर झाडे रस्त्यावर टाकून भामरागड-आलापल्ली मार्गही बंद केला आहे.