नीलेश पवार

राज्याच्या राजकारणात सत्तेत सहभागी असलेल्या आणि अनेक वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यात आपली पाळेमुळे रोवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला नंदुरबारमध्ये मात्र वर्षभरापासून जिल्हाध्यक्ष मिळत नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रवादीचा कधीकाळी या जिल्ह्य़ात दबदबा होता; परंतु गेल्या काही वर्षांत नंदुरबारमध्ये पक्षाची पीछेहाट होत असून पक्षाला नेतृत्व करण्यासाठी आदिवासी चेहराच सापडत नसल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून नंदुरबार जिल्ह्य़ात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. विजयकुमार गावितांना बळ देत शरद पवारांनी आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये आपल्या पक्षाची पकड मजबूत केली होती. नंतर डॉ. गावित राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हापासून जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आल्याचे निवडणुकांमधून उघड झाले. डॉ. गावित यांच्यानंतर त्यांचे बंधू राजेंद्र गावितांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांनी त्यांना साथ दिली. मात्र दोघेही डॉ. विजयकुमार गावितांचे बंधू असल्याने आणि त्यांचा ओढा पक्षापेक्षाही गावित कुटुंबांना मोठे करण्याकडे राहिल्याने पक्षापेक्षाही गावित घराण्याचे महत्त्व अधिक वाढत गेले. विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत राजेंद्र गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. दुसरीकडे शरद गावितांच्या दोन्ही कन्या या जिल्हा परिषद निवडणूक भाजपकडून जिंकल्याने या दोन्ही भावांना तेव्हापासून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी दूर ठेवल्याचे सांगितले जाते.

पक्ष निरीक्षक उन्मेष पाटील यांनी जिल्ह्य़ात पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. नंतर पक्षाची जबाबदारी सोपावण्यात आलेल्या अनिल गोटे यांनी जिल्हाभर दौरे करत जिल्हाध्यक्ष पदासाठीची चाचपणी केली. पडत्या काळात पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणारे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांची वर्णी जिल्हाध्यक्ष पदावर लागणार असल्याचा कयास बांधला जात असतानाच डॉ. अभिजीत मोरे यांनीदेखील जिल्हाध्यक्ष पदासाठी उत्सुकता दाखवली. मूळचे राष्ट्रवादी विचार असलेल्या मोरे कुटुंबाने काही वर्षांपासून राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेची वाट धरली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेल्या डॉ. अभिजीत मोरे यांचे बंधू विक्रांत मोरे हे सध्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय त्यांच्या मातोश्री शोभाताई मोरे यादेखील शिवसेना नगरसेवक आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन पक्षाध्यक्ष देऊन गावितांनंतर एकाच घरात सत्ताकेंद्र एकवटण्याचा प्रयोग राष्ट्रवादी पुन्हा करेल का, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

जिल्ह्य़ातील नेत्यांकडून चाचपणी

गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे सरचिटणीस अर्जुन टिळे आणि आदिकांनी जिल्हा दौरा करत चाचपणी केली. या वेळी काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील काही मोठय़ा नेत्यांचीदेखील त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात सर्वच विधानसभा, लोकसभेच्या जागांसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील बहुतांश जागा या आदिवासी राखीव असल्याने जिल्ह्य़ात पक्षाच्या नव्याने बांधणीसाठी एखादा सक्षम आदिवासी नेता शोधण्याची गरज आहे. त्यात राष्ट्रवादीतून इतर पक्षांत गेलेले काही नेते पुन्हा गळाला लागतात का, याची चाचपणीदेखील राष्ट्रवादी करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याच्या सत्तेत प्रभावी असलेली राष्ट्रवादी नंदुरबार जिल्ह्य़ाच्या राजकारणात पिछाडीवर पडली आहे.