विधानसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांबरोबरच ट्विटनंही लक्ष वेधून घेतलं. निवडणूक निकालानंतर तर संजय राऊत यांचा शायरी असलेलं ट्विट असं समीकरणचं झालं होतं. पुढे महाविकास आघाडीचं गणित जुळल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकही संजय राऊत यांना ट्विट करून उत्तर द्यायला लागले. हे अजूनही थांबलेलं नाही. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला नवाब मलिक यांनी फुल और कांटे सिनेमातील गाण्याच्या ओळीतून उत्तर दिलं आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सतत चर्चेत राहिले. निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी सत्तावाटपात समान वाटा अशी भूमिका घेत शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. विशेष म्हणजे भाजपाकडून मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड होणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यातही महत्वाचा वाटा राहिला. पण, सगळ्यात जास्त चर्चेत राहिले ते राऊत यांचे ट्विट. संजय राऊत यांनी वारंवार शेरोशायरीच्या माध्यमातून भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर टोलेही लगावले. राऊत यांची ट्विटची मालिका अजूनही सुरूच आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केलं होतं. ज्यात “राजकारणात काहीही अंतिम नसतं. सगळ चालत राहतं,” असं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या ट्विटला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. मंगळवारी सायंकाळी नवाब मलिक यांनी फुल और कांटे सिनेमातील गाण्याच्या ओळी ट्विट केल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा सूर विरोधी पक्षाकडून लावला जात आहे. त्यावरून मलिक यांनी संजय राऊत यांना टॅग करत
“धीरे धीरे प्यार को बढ़ाना है ,
हद से गुजर जाने है,”
असं म्हटलं आहे. सलोख्यानं हळूहळू पुढे जायचं असं आवाहन करत मलिक यांनी हे सरकार टिकवून दाखवायच असं अप्रत्यक्ष आवाहनच मलिक यांनी संजय राऊत यांना केलं आहे.