माढा लोकसभेची जागा स्वत: लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर माढा येथे येऊन जाहीर केला. तत्पूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी तुम्ही माढ्याच्या मागे का लागलात, असा प्रतिसवाल केला. मी माढ्याचे पाहतो, तुम्ही चिंता करू नका, असेही त्यांनी म्हटले. गुरुवारी माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी पवार हे पिंपळनेर येथे आले होते.

ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा प्रश्न संपुष्टात आला आहे. राज ठाकरे हे फक्त नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाऊ नयेत या विषयापुरते मर्यादित आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकांश आंबेडकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पुलवामा दहशतवादी हल्ला हा देशावरील हल्ला आहे. सर्व पक्ष सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारसोबत आहेत. परंतु, भाजपा सर्जिकल स्ट्राइक आणि जवानांच्या योगदानाचा राजकीय फायदा उठवत आहे, असा आरोप केला. या हल्ल्यानंतरही मोदी हे सभा घेत फिरत आहेत. यावरून त्यांची शहीद जवानांप्रतीची भावना दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.

राज्य सरकार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाचा ठराव करणार आहे. तो केंद्राकडे पाठवणार आहे. मात्र, यामुळे धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळणार नाही. हा धनगर समाजावर अन्याय आहे. आरक्षण देणे राज्य सरकारचे काम नाही. आरक्षण मिळेपर्यंत खरे नसल्याचेही ते म्हणाले.