शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळण्यात आला. विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचे आवाहन केले. तर पुण्यातही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. याचेच पडसाद राज्यातील अन्य ठिकाणीही पडल्याचं पहायला मिळालं. ईडीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (बुधवार) परळी शहरात निदर्शने करण्यात आली. तसेच या कृतीचा निषेध म्हणून उद्या (गुरूवार) परळी बंदची हाकही देण्यात आली आहे.

परळीच्या शिवाजी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धास्ती घेवून त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजपाच्या सरकारने सुडबूध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात शरद पवार यांच्यावर कारवाई केली असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आलं.

आणखी वाचा- शरद पवारांवर गुन्हा : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

उद्या परळी बंदची हाक
दरम्यान सरकारच्या या कारवाईविरोधात उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जूलमी राजवट चालणार नाही, असा इशारा यावेळी युवक नेते अजय मुंडे यांनी दिला.