करोना संकटात सध्या अनेक लोकप्रतिनिधी करोना रुग्णांसाठी मैदानात उतरलेले असून आपापल्या परीने शक्य ती मदत करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश आहे. करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने रोहित पवार अनेकांच्या भेटीगाठी घेत असतात. दरम्यान सोमवारी रोहित पवार कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी गेले असता सैराटमधील झिंगाट गाण्यावर ठेका धरत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. रोहित पवार यांनी या कोविड सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि रोहित पवारही त्यात सहभागी झाले.

पहा व्हिडीओ – 

रोहित पवार यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे –

रोहित पवार यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला असून म्हटलं आहे की, “गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो”.

रोहित पवारांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोमवारी राज्यात करोनाचे २२ हजार १२२ नवे रुग्ण आढळले असून ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.