आ. बबनराव शिंदे यांची खंत

सोलापूर : यापूर्वी १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात शिवसेनेने मंत्रिपदाची संधी देऊ केली असता आपण नाकारली होती. तद्पश्चात आता विधानसभेवर सलग सहाव्यांदा निवडून आल्यानंतर मागितले तरीही मंत्रिपद मिळत नाही, अशा शब्दात माढय़ाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी खंत व्यक्त केली. मात्र मंत्रिपद हे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

माढा येथे दिवंगत पत्रकार शाहजहान शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार आमदार शिंदे यांना प्रदान समारंभपूर्वक करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार अ‍ॅड. धनाजी साठे, विनायकराव पाटील, लेखक प्रा. डॉ. राजेंद्र दास आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिंदे म्हणाले, १९९५ साली आपण सर्वप्रथम माढा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो, तेव्हा राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीला आपण पाठिंबा दिला होता. त्या वेळी युतीने आपणांस मंत्रिपदाची संधी देऊ केली होती. परंतु आपण मंत्रिपदाऐवजी माढा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्यानुसार युती सरकारने माढा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या सीना-माढा उपसा सिंचन योजना व अन्य महत्त्वाकांक्षी योजनांसाठी भरीव निधी दिला. त्यातून पाण्याचा प्रश्न निकाली लागून माढय़ाचे भाग्य उजळले. याच विकासाच्या भांडवलावर आपण मतदारांची विश्वासार्हता कायम राखली आणि त्याच बळावर सलग सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आलो.

२५-३० वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत असताना यंदा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी आपणांस खात्री होती. परंतु मागणी करूनही मंत्रिपद नाकारले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यावर लगेचच सावरून घेताना मंत्रिपद हेच सर्वश्रेष्ठ नसते, तशी भावना आपण कधीही बाळगत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कर्तव्यभावना जागृत ठेवायली हवी. काम करणाराच चुकत असतो. कामच न करणारा कधी चुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण नेहमीच विकास कामांना प्राधान्य देत आलो असून भविष्यातही आणखी विकास कामे पूर्ण करायची आहेत. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी आमदार बबनराव शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देताना सोबत किरण चव्हाण (आदर्श पत्रकार), शिवाजी जगदाळे (सामाजिक कार्य), सिद्धेश्वर शिंदे (युवा पत्रकार), शिवाजी वायचळ (शिक्षण कार्य) आदींना रामानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अयुबखान शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या समारंभास माढय़ाच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. मीनल साठे, कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी आदींची उपस्थिती होती.